गुहागर जागेबाबत भाजप कार्यकर्त्यांची घालमेल
वेगळा निर्णय घेण्याचीही तयारी; रवींद्र चव्हाण करणार शांत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : भाजपचे नेते बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर महायुतीत गुहागरच्या जागेबाबत अंतिम निर्णय होणार आहे. गुहागरची जागा नाही मिळाली तर भाजप कार्यकर्ते संघटनात्मक पातळीवर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. गुरूवारी (ता. २४) चव्हाण रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. एक जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली आहे. जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी राहिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. गुहागरमध्ये भाजपची मदार माजी आमदार विनय नातू यांच्यावरच आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांची भेट घेतली.
माजी आमदार विनय नातू स्वतः संघटनात्मक पातळीवर भाजप नेत्यांशी चर्चा करत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीतही गुहागरच्या जागेचा समावेश नव्हता. त्यामुळे गुहागरमधील पदाधिकाऱ्यांची घालमेल वाढली आहे. आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, गुहागरची जागा शिवसेनेला सोडली तर भाजप कार्यकर्त्यांना शांत करावे लागणार आहे. त्यासाठी भाजपा नेते रवींद्र चव्हाण हे रत्नागिरीला येणार आहेत. त्या वेळी ते भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्या वेळी ते स्थानिक पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कोट
रवींद्र चव्हाण भाजपचे नेते आहेत. त्यांच्यासमोर आम्ही शक्तीप्रदर्शन करणार नाही. आमची ताकद त्यांना माहित आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी गुहागरच्या जागेसाठी आग्रही आहोत. रत्नागिरीतील बैठकीमध्ये गुहागरची जागा भाजपला देण्याचा निर्णय झाला नाही तर भाजप कार्यकर्ते निर्णय घेतील.
- नीलेश सुर्वे, तालुकाध्यक्ष भाजप गुहागर
चौकट
२००९ची पुनरावृत्ती होणार का ?
2009च्या निवडणुकीत गुहागरची जागा भाजपने शिवसेनेला सोडल्यानंतर भाजप नेते विनय नातू यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या वेळी भाजपला गुहागरमधून जिंकण्याचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जर जागा मिळाली नाही तर पुन्हा 2009 प्रमाणे भाजप अपक्ष उमेदवार देणार का ? याची सर्वांना उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.