20663
जनता केसरकरांचे गर्वहरण करेल
राजन तेली ः निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आमिषे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः मंत्री दीपक केसरकर आजही जनतेसमोर भावनिक आवाहन करत असून, त्यांनी हे प्रयत्न आता सोडावेत. अनिष्ट प्रवृत्ती, वाईट विचार, संस्कृती या सर्व गोष्टींना जनता आता फसणार नाही. तुमचे सोयीस्कर राजकारण करण्याचे दिवस संपले असून, या निवडणुकीमध्ये जनता तुमचे गर्वहरण करणार, अशी टीका माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केली. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.
श्री. तेली यांनी आज संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, तालुका संघटक मायकल डिसोजा आदी उपस्थित होते. तेली म्हणाले, ‘‘मंत्री म्हणून केसरकरांनी आपल्याला मिळालेल्या खात्यात कधीच उजेड घातला नाही. गेल्या पंधरा वर्षांत आमदार या नात्याने काहीच विकास केला नाही. केवळ जनतेला खोटी आश्वासने देऊन, खोटे बोलून फसवण्याचे काम त्यांनी केले. प्रत्येक निवडणुकीमध्ये भावनिक, सोयीस्कर राजकारण करायचे काम हे केसरकर करत आले आहेत. सावंतवाडीची संस्कृती, अनिष्ट प्रवृत्ती, वाईट विचार आदी गोष्टींचा बाऊ करून त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीमध्ये जनता फसणार नसून, त्यांची डाळ शिजणार नाही. कुठलाही आधार घ्या, जनता तुम्हाला जर्मनीलाच पाठवणार आहे.’’
तेली म्हणाले, ‘‘माझ्यावर बाहेरचा म्हणून केसरकर टीका करतात. मात्र, ते सावंतवाडीचे आहेत. पण, चार दिवस तरी ते येथे राहतात का? जनतेने तुम्हाला पंधरा वर्षे दिली असतानाही तुम्ही स्वतःच्या घरासमोरील एसटी स्टँड सुधारू शकला नाहीत. मल्टिस्पेशालिटीची एकही वीट बसवू शकला नाहीत. पंधरा वर्षांत विकास केला, असे तुम्ही म्हणत असाल तर आज मतदारसंघात जनतेला आमिष दाखवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करेन. नेहमी खोटे बोलणाऱ्या अपप्रवृत्तीला जनतेला इथून घालवणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचा आजही मी सन्मान करतो. त्यांनी माझे काही वाईट केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काहीही बोलणार नाही. मात्र, मी पक्ष सोडल्याने माझ्यासोबत तुम्ही या, असे कोणालाही सांगितले नाही. ज्या लोकांवर स्थानिक आमदाराकडून अन्याय झाला, ज्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत केसरकर यांनी राजकारण केले ते लोक निश्चितच त्यांना निवडणुकीमध्ये जागा दाखवतील.’’ श्री. राऊळ म्हणाले, ‘‘तेली यांना पक्षात घेतल्याने मी नाराज असल्याचा प्रश्नच नाही. मी इच्छुक होतो आणि इच्छुक असण्यामध्ये काही गैर नाही. परंतु, पक्षाचे हित काय, हे मला माहीत आहे आणि पक्ष हितासाठी तेलींना निवडून आणण्यासाठी मी तन-मन-धन पणाला लावणार आहे. अन्य कोणीही नाराज असतील तर ते सुद्धा लवकरच आमच्या सोबत दिसतील.’’
---------------------
जेटी प्रकल्पाला केसरकरांचा विरोध
रोजगाराच्याबाबतीत आडाळी एमआयडीसी येथे उद्योग आणले, असे केसरकर सांगत आहेत. परंतु, स्थानिक उद्योजक सोडता एकही प्रकल्प तिथे आला नाही. मात्र, रोजगार येण्यासाठी आरोंदा या ठिकाणी आम्ही जेटी प्रकल्प उभारला असताना, केसरकारांनी त्याला विरोध केला, असेही तेली म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.