25785
25786
सोनुर्ली जत्रोत्सवाची तुळाभाराने सांगता
माऊली चरणी लोटांगणासाठी महिलांचाही गर्दी; कडेकोट बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष आणि महिला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून नवसफेड केली. शनिवारी (ता. १६) रात्री तब्बल दोन तास मंदिर परिसरात हा नयनरम्य सोहळा सुरू होता. यावेळी हजारो हात लोटांगण सुरळीत पार पाडण्यासाठी सरसावले. दोन दिवसांच्या या उत्सवाची आज तुळाभाराने सांगता झाली.
दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीच्या दोन दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाला शनिवारी (ता. १६) रात्री तुफान गर्दी उसळली. मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला. दिवसभर असलेल्या तुरळक गर्दीचे रुपांतर रात्री आठनंतर भाविकांच्या जनसागरात झाले. रात्री साडेदहा वाजता देवीची पालखी कुळघराकडून वाजतगाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाली. विधीवत प्रथेप्रमाणे ११ वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वी भाविक भक्तांना देवीचे दर्शन आणि ओटी, केळी ठेवण्याचे कार्यक्रम अविरत सुरू होता. पालखी मंदिरात आल्यानंतर हा कार्यक्रम खंडित करण्यात आला. मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणांना सुरुवात झाली. मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन ती पूर्ण केली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो महिला व पुरुष भक्तांनी लोटांगण घालून आपला नवस फेडला. यावर्षीही महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. लोटांगणाचा कार्यक्रम सुरु होताच श्री देवी माऊलीच्या अवसारांनी तरंग काठीसह भक्तांना दर्शन दिले. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता. संपूर्ण उत्सवावर देखरेख ठेवण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लोटांगण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मंदिराभोवती हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ पुरुष भक्तांची लोटांगणे सुरू होती. त्यानंतर महिलांची लोटांगणे सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील गावकरी मंडळी, केळीकुळ आदींनी देवीच्या दर्शनासाठी व केळी, नारळ, ओटी भरण्यासाठी गर्दी केली.
चौकट
उमेदवारांनी घेतले दर्शन
विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहे; मात्र असे असतानाही वेळात वेळ काढून प्रत्येक उमेदवाराने जत्रोत्सवाला उपस्थिती दर्शवून देवीचे दर्शन घेतले. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अर्चना घारे-परब, राजन तेली यांनी देवीचे दर्शन घेतले. देवस्थान कमिटीकडून सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
चौकट
एसटीच्या सेवेबाबत भाविकांत समाधान
सोनुर्ली जत्रोत्सवाला दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बस फेऱ्या सोडला जातात. यावर्षी एसटी विभागाने प्रवेशांकरिता जादा गाड्यांची सोय केली. त्यामुळे भाविकांना सोनुर्लीत येऊन देवीचे दर्शन घेणे सोपे झाले. अनेकांनी एसटीच्या सोईबाबत समाधान व्यक्त केले.
चौकट
दोन दिवसांमध्ये लाखोंची उलाढाल
सोनर्ली जत्रोत्सवावर पावसाचे सावट असल्याने व्यापारीवर्गातून भीती व्यक्त होत होती; मात्र जत्रोत्सव पार पडेपर्यंत पावसाचे विघ्न आले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय तेजीत होऊन या दोन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.