राजापूर विधानसभा
24N25885
किरण सामंत
मतदारसंघ ‘सुजलाम् सुफलाम्’ करणार : किरण सामंत
लोकसभा निवडणुकीवेळी फिरताना अन्य विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ विकासापासून मागास राहीला आहे. त्यामुळे भावनिक राजकारणात गुंतल्यामुळे गेली पंधरा वर्षे विकासापासून वंचित राहीलेल्या या मतदारसंघाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी घेऊन महायुतीतर्फे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरलो आहे. संधी मिळाली तर हा मतदारसंघ ‘सुजलाम् सुफलाम्’ करू, अशी भूमिका राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.
- राजेंद्र बाईत, राजापूर
....
प्रश्न : निवडणुकीतलं व्हिजन काय?
उत्तर : आरोग्य, शिक्षण, पाण्याची व्यवस्था, रस्ते, वीज यांसारख्या पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य देत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील विकासात्मक मागासलेपण दूर करणार आहे. छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांची उभारणी करीत त्याद्वारे रोजगारनिर्मितीही केली जाणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांची पसंती मिळत असलेल्या राजापूर-लांजा तालुक्यांतील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची उभारणी करीत ही पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहे. त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि व्यवसाय उभारणीला चालना मिळेल. राजापूरच्या प्रसिद्ध गंगातीर्थक्षेत्राचाही पर्यटनदृष्ट्या विकास साधण्याला प्राधान्य देणार आहे. राजापूर शहराला भेडसावणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पुराच्या समस्येसह शहर विकासात अडथळा ठरणारी पूररेषेची समस्या, देवस्थान इनाम जागेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्याकडेही विशेष लक्ष देणार आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार प्रशासकीय सेवा मिळवून देण्याकडेही विशेष लक्ष आहे.
...
प्रश्न : मतदारसंघात काय बदल घडवून आणला?
उत्तर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून अन् सहकार्याने राज्यातील महायुती शासनाकडून मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षांमध्ये सुमारे पाचशे कोटींहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात यश आले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माचाळ पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यावर भर दिला आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करीत त्याद्वारे साखरीनाटे बंदराच्या येथे विविध सोयीसुविधांनी युक्त अशा जेटीच्या उभारणी करण्यात येत आहे. त्यासोबत मच्छीमारांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचीही उभारणी करण्यात येणार आहे. सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळविण्यात आपणाला यश आले आहे.
...
प्रश्न : विखुरलेल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवित आहात?
उत्तर : हा विधानसभा मतदारसंघ वाडी-वस्तीवर विखुरलेला आहे. या मतदारसंघात विकासकामांसह वैयक्तिक स्तरावर पूर्वीपासून सातत्याने संपर्क राहिलेला आहे. त्याच्या जोडीला संघटनात्मक बळ आहे. त्यामुळे मतदारसंघ विखुरलेला असला तरीही, प्रचारादरम्यान जनतेपर्यंत पोहोचण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत. विधानसभा निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहत असून, त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपले व्हिजन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
...
प्रश्न : पर्यावरणपूरक कोणते प्रकल्प आणणार?
उत्तर : सुशिक्षित असलेल्या युवक-युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मात्र, रिफायनरीसह अन्य कोणताही प्रकल्प स्थानिकांच्या इच्छेविरोधात येथे येणार नाही. सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले दोन पर्यावरणपूरक प्रकल्प आपल्या पुढाकारातून याठिकाणी येऊ घातले असून, या प्रकल्पांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या रखडलेल्या विकासाला चालना मिळेल. तरुणांचे नोकरी वा व्यवसायासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योग आणताना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षित करणे, छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांसाठी शासकीय अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे यालाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
...
प्रश्न : विकासाच्या व्हिजनला लोकांची साथ मिळणार का?
उत्तर : गेल्या पंधरा वर्षांत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना विधायक कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. रस्ते, वीज, पाणी आरोग्य या मूलभूत सुविधांची वानवा आहे. पण, रोजगार निर्मितीबाबत या लोकप्रतिनिधींनी काहीच काम केलेले नाही. मतदारसंघ विकासाच्या प्रतीक्षेत असून, केवळ भावनिक राजकारण करून विकास होणार नाही. उलट महायुती शासनाच्या माध्यमातून विकासकामांसाठी पाचशे कोटींहून अधिक विकासनिधी आणला आहे. त्यामुळे भरघोस मतदानाच्या माध्यमातून मतदार, जनता विकासाला निश्चितच साथ देईल, याची खात्री आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.