25863
वैभव नाईक
एमआयडीसीत उद्योगवृद्धीस
कटिबद्धच ः वैभव नाईक
लीड
गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून केलेली वाटचाल हीच माझ्यासाठी विजयाची हॅटट्रिक असेल. भविष्यात येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असणार आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात झंझावात विकास, विविध रोजगारविमुख उपक्रम तसेच एमआयडीसीमध्ये उद्योग आणण्यासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचे मत महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांनी विशेष मुलाखतीत व्यक्त केले. विधानसभेच्या अनुषंगाने श्री. नाईक यांची घेतलेली ही मुलाखत...
--
प्रश्न ः कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या वाटचालीबद्दल काय सांगाल?
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचा विकास करताना गेली दहा वर्षे मी केलेल्या कामाची पोचपावती जनतेसमोर आहे. सत्तेत असताना विकासासाठी कोट्यवधी निधी आणला तर सत्ता नसताना विकासाची गंगा कार्यरत ठेवली. मी दहा वर्षे केलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडे पैशाचा पाऊस पाडल्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नाही. येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असल्यामुळे त्यानीं दिलेल्या संधीमुळे मला सरकारमध्ये स्थान मिळेल. आमदार म्हणून जनतेने सोपविलेली जबाबदारी पार पाडत असताना सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी उठवून मी भात पिकाला योग्य हमीभाव मिळवून दिला. पीक विम्यामध्ये आंबा, काजू या पिकांचा समावेश करण्यासाठी यशस्वी लढा दिला. माझ्या मतदारसंघात हत्ती हटाव मोहीम यशस्वीपणे राबविली. वन्यप्राण्यांपासून शेती आणि फळ बागायतींच्या होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ‘सिंधुरत्न योजने’तून जिल्ह्यातील शेतकरी व पारंपरिक मच्छीमारांना अनेक लाभ मिळवून दिले. पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्नांची मला पुरेपूर जाणीव असल्यामुळे पर्सनेट व एलईडी मासेमारी विरोधात विधिमंडळात वेळोवेळी आवाज उठवला. संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या महामारीत माझ्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी मी कार्यरत होतो. तौक्ते चक्रीवादळाच्या संकटात देखील मतदारसंघातील भयाण परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मी मदतकार्य सुरूच ठेवले. त्यामुळेच इथल्या जनतेशी असलेले माझे ऋणानुबंध अधिकच दृढ होत गेले आणि भविष्यातही आपल्यातील हे नाते अशाच प्रकारे टिकून राहील.
----------------------
प्रश्न ः आतापर्यंत कोणती विकासकामे मार्गी लावली?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये सर्वप्रथम मी मालवण नगरपरिषदेची नळपाणी योजना मंजूर करून त्यासाठी ४३ कोटी रुपये रक्कमेचा कार्यारंभ आदेश काढून घेतला. कुडाळवासीयांच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी भंगसाळ नदीवर ब्रीजकम बंधारा बांधून पाण्याची साठवण केली आहे. मतदारसंघातील शंभरपेक्षा जास्त गावांमध्ये माझ्या आमदार निधीतून मी सभामंडप उभारले आहेत. कुडाळ व ओरोस येथे नवीन बसस्थानके बांधली असून मालवण येथील बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी जेष्ठ नागरीकांसाठी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच दिव्यांग बांधवांना गेली सात वर्ष चारचाकी स्कूटरचे वाटप करीत आहे. आरोग्य, क्रीडा, पर्यटन, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करून कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासाचा गेल्या दहा वर्षातील बॅकलॉग भरून काढला आहे. येथील मतदारसंघातील युवा वर्गाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
--------------------
प्रश्न ः विजयाची हॅटट्रिक साधणार काय?
गेल्या काही वर्षात झालेली राजकीय उलथापालथ पाहता मी मतदारांशी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तमाम जनतेसमोर माझा स्वच्छ चेहरा आहे. हे मला विजयासाठी फलश्रुतीदायक ठरणार आहे. दोन लोकप्रतिनिधी कार्यरत असताना मी लोकप्रतिनिधी म्हणून केलेले काम आणि महायुतीचे उमेदवार लोकप्रतिनिधी असताना त्यांनी कोणते काम केले हे जनतेसमोर आहे. मी केलेल्या कामाची पोचपावती मला मतदान निश्चित देतील, याची मला खात्री आहे. मी लोकांच्या सुखदुःखात किती सहभागी झालो ते किती सहभागी झाले हे जनतेला माहित आहे. महिलांना सन्मान देण्याचे काम निश्चित आम्ही केले आहे. यापुढे सुद्धा निश्चित करू. एकूणच सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. यापुढील काळात पर्यटनदृष्ट्या रोजगारावर विशेष भर देणार आहे. गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून केलेली वाटचाल हीच माझ्यासाठी विजयाची अटी साधणारी निवडणूक ठरणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.