25897
देवगड पाणीप्रश्नाचा श्रेयवाद
नको ः विलास साळसकर
महायुतीमुळेच प्रश्न मार्गी लागल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ ः येथील देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नळपाणीप्रश्न मार्गी लावण्याचे श्रेय महायुती सरकारचे असून, ते अन्य कुणीही घेऊ नये, असा सल्ला शिंदेगट शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिला.
ठाकरे गट शिवसेना पक्षाचे नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी केलेल्या टिकेच्या अनुषंगाने श्री. साळसकर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गेली कित्येक वर्षे रखडलेला पाणी प्रश्न शिवसेनेच्याच माध्यमातून २०१४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नागपूर अधिवेशनात संबंधित पाणी विभागाचे अधिकारी, सचिव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत चर्चिला गेला. याबाबत चर्चा होऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. नंतरच्या काळात देवगडचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पुढील पाच वर्षांच्या काळात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. पाच वर्षांचा कालावधी संपून पुढील नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना शिवसेनेने दिले होते. पुढे सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता देवगड जामसंडे नगरपंचायतीवर आली त्यापासूनच खऱ्याअर्थाने हा पाणीप्रश्न मार्गी लागण्याकरिता प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, राज्यात सत्तापालट होऊन शिवसेना शिंदे गट व भाजप महायुतीची सत्ता आली. दरम्यानच्या काळात येथील नगराध्यक्षांसह एका नगरसेवकाने शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. देवगडच्या प्रलंबित विकासासाठी आपणासह अमोल लोके यांच्या माध्यमातून उदय सामंत व शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पाणी प्रश्न मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सतत पाठपुरवठा करून संबंधित विभागाने मंत्री महोदयांशी चर्चा करून नळपाणी योजनेसाठी आवश्यक कार्यवाही मार्गी लावली. यासाठीचा पाणी आरक्षण दाखला महायुती सरकारच्या काळात नगरपंचायतीला प्राप्त झाला. विधानसभा निवडणुकीनंतर पुढील वर्षभरात योजना मार्गी लागेल.’’
नगरपंचायतीला प्रचंड प्रमाणात निधी येत असताना विकासकामे रखडली. प्रसंगी निधी रद्द होऊन अन्यत्र वळविला, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. नगरपंचायत प्रभाग क्रमांक ११ मधील प्रसाधनगृहाला केंद्रस्तरीय समितीकडून फाईव्ह स्टारचे मानांकन दिले. मात्र, त्याची आज काय परिस्थिती आहे? शहरातील बसस्थानक समोरील सेल्फी पॉईंट गेले तीन महिने अंधारात असल्याची टीकाही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.