25912
कोंढेतड, डोंगरतिठा रस्ता
प्रवासासाठी ‘डेंजर झोन’
महामार्गावरील स्थिती; रस्ता तीव्र उतार आणि वळणांचा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः मुंबई-गोवा महामार्गावरील कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता आधीच तीव्र उतार आणि वळणांचा आहे. त्या परिसरात मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी वाहने ये-जा करीत असतात. तसेच कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी डावीकडून उजवीकडे वळणारी वाहने त्या रस्त्यावर येतात. अशा विचित्र स्थितीमुळे तिथे अपघाताला निमंत्रण मिळत असल्यामुळे कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता प्रवासासाठी ‘डेंजर झोन’ झाला आहे.
शहराजवळील कोंढेतड येथुन मुंबई-गोवा महामार्गावरून विविध भागात जाणारे मार्ग वा रस्ते आहेत. त्यामध्ये या भागात वाहनांसह लोकांची नेहमीच वर्दळ अन् गर्दी असते. पाच महिन्यांपूर्वी कोळशाच्या ट्रकने दुचाकी उडवून मोटारीला दिलेल्या धडकेतून कोंढेतड गाडगीळवाडी येथे अपघात झाला होता. या अपघातातून महामार्गावरील ठिकाण धोकादायक असल्याचे प्रकर्षाने पुन्हा एकदा पुढे आले होते. महामार्गावरील कोंढेतड गाडगीळवाडी येथील परिसर वळणाचा आणि उताराचाही आहे. अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचाच पूल पार करून मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने धावणार्या वाहनांना येथील नागमोडी वळणांचा झपकन फारसा अंदाज येत नाही. त्याचवेळी डोंगर, विल्ये, जैतापूर आदी भागांमध्ये जाणारी वाहने मोठ्या पूलावरून रस्त्याने येत पुढे कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी त्यांना महामाग पार करून डावीकडून उजवीकडे वळावे लागते. त्याचवेळी या भागातील पूर्वीच्या जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणार्या वाहनांचीही वर्दळ असते. शहराच्या दिशेने जाणार्या पूर्वीच्या जुन्या रस्त्याच्या येथे कोणताही माहितीफलक वा दिशादर्शक फलक लावलेला नसल्याने गोव्याकडून मुंबईकडे भरधाव जाणार्या वाहनाला डोंगरतिठा येथे आल्यानंतर नेमके कुठल्या रस्त्याने जायचे? असा प्रश्न निर्माण होतो. दोन वर्षापूर्वी कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाणार्या दुचाकीला महामार्गावरून भरधाव येणार्या वाहनाची धडक बसून अपघात झाला होता. त्यात एकाला जीवही गमवावा लागला होता. हा परिसर प्रवासासाठी डेंजर झोन बनलेला आहे. त्यावर दिशादर्शक वा रस्त्याची माहिती देणारा फलक यासारख्या वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात तिथे वारंवार अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
------
कोट
मुंबई-गोवा महामार्गावर कोंढेतड येथील वळणावर वेगवेगळ्या दिशेने वाहने येतात. त्याचा अनेकवेळा वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे याठिकाणी अपघाताच्यादृष्टीने हा परिसर डेंजर झोन झाला आहे. त्यामुळे याठिकाणी योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात.
- विकास देसाई, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.