25948
देवगड : येथे रविवारी महाविकास आघाडीच्या प्रचारानिमित्त झालेल्या जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे. (छायाचित्र : संतोष कुळकर्णी)
महाराष्ट्राला राख; गुजरातला रांगोळी
आदित्य ठाकरे : पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांना विरोधच
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ ः महाराष्ट्राच्या वाट्याला राख आणि गुजरातमध्ये रांगोळी, असे चालणार नाही, असे ठाकरेगट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे ठणकावले. ‘पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प येथे नकोत. शाश्वत विकासाचे प्रकल्प कोकणी माणसाला हवे आहेत. त्यासाठी राज्यासह येथील मतदारसंघात परिवर्तनसाठी ‘मशाल’ पेटवावीच लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.’
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांचे उत्साही स्वागत झाले. यावेळी ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील वाढती बेरोजगारी, बंद पडत चाललेले उद्योग, व्यवसाय याबरोबरच स्थानिक प्रश्नांकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राची शक्ती कमी करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. आता भाजपला विरोधी बाकावर बसवण्याचे मतदारांची ठरवले आहे.’ मागील दोन वर्षात राज्यातील सरकार एकही नवा उद्योग आणू शकले नाहीत, असा दावा ठाकरे यांनी योवळी केला.’
पारकर म्हणाले, ‘आजवर वैचारिक परंपरा लाभलेला हा मतदारसंघ आहे. भाजपने विकास केला तर गावांगावात आमिषे का दाखवत आहेत? हिंमत असेल तर विकासावर मते मागा. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला एक संधी द्या, मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार.’
शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांनी राणे कुटंबीयांच्या पक्षांतराचे पर्यटन थांबवा, त्यांचे स्टेज बदलले की भाषण बदलते असा टोला लगावला. ते म्हणाले, ‘मागील ३४ वर्षांत राणेंनी तर १० वर्षे आमदारांनी काही केले नाही.’
जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथील नळपाणी प्रश्न सोडवता आला नाही; परंतु, त्याला खो घालण्याचा प्रयत्न आमदारांनी केला, अशी टीका केली. परशुराम उपरकर म्हणाले, ‘बाळासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मशाल निशाणीचे बटन दाबून आमदारांना घरी बसवा आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हा.’ यावेळी सतीश सावंत, अतुल रावराणे, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर आदींनी मनोगत व्यक्त केले. अनंत पिळणकर, सुशील राणे, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, स्वप्नील धुरी, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर आदी उपस्थित होते. प्रसाद दुखंडे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, तालुक्यातील विविध भागांतील कार्यकर्त्यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षात प्रवेश केला.
चौकट
देवगड तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर
देवगडचा पाणीप्रश्न गंभीर आहे. पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी मिळत नाहीत ते हिंदू नाहीत काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करून परिवर्तनासाठी मशाल प्रज्वलित करण्याचे आवाहन केले.
चौकट
परदेशात हापूस विक्रीसाठी प्रयत्न
येथील जगप्रसिद्ध देवगड हापूससाठी जागतिक पातळीवर फूड प्रोसेसिंग युनिट करण्याबरोबरच हापूस विक्रीसाठी परदेशात स्टॉल लावण्याबाबत पुढाकार घेऊ, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.