‘रामकृष्ण हरी’ पाट
भजन स्पर्धेत प्रथम
सावंतवाडी ः निरवडे-कोनापाल पुरस्कृत येथील श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत पाट (ता. कुडाळ) येथील रामकृष्ण हरी सेवा संघ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय कणकवलीचे सिद्धिविनायक मंडळ, तृतीय पिंगुळी-कुडाळच्या महापुरुष भजन मंडळाने पटकावला. उत्तेजनार्थ प्रथम नेरुर मोरेश्वर भजन मंडळ, द्वितीय मातोंड इसवटी भजन मंडळाला देण्यात आला. उकृष्ट गायक आशिष सडेकर (रामकृष्ण मंडळ पाट), उत्कृष्ट पखवाज शुभम जाधव (श्री स्वामी मंडळ, कलंबिस्त), उत्कृष्ट हार्मेनियम दुर्गेश मिठबावकर (सिद्धिविनायक मंडळ), उत्कृष्ट झांज चंदन ढवळ (रवळनाथ घोडगे), उत्कृष्ट तबला महंत नेमण (इसवटी मातोंड), उत्कृष्ट कोरस (समाधी पुरुष मळगाव) यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत दहा भजन संघांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून दीप्तेश मेस्त्री (न्हावेली), मोहन मेस्त्री (कुडाळ) यांनी काम पाहिले. सतीश वारंग यांनी सूत्रसंचालन केले.
------------
देवसू शेंडोबा माऊली
जत्रोत्सव शनिवारी
ओटवणे ः देवसूचे ग्रामदैवत देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. २३) होणार आहे. शेंडोबा माऊली देवसूसह केसरी आणि दाणोली या तीन गावांचे एकत्रित देवस्थान आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्णालंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. या दिवशी तीन गावच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर दर्शन सोहळ्यास सुरुवात होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणूक व आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. यानिमित्त मंदिरात २६ नोव्हेंबरला सकाळी सात प्रहराच्या हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी निघणार आहे. या दिवशी देवसू परिसरातील भजनी मंडळे आपली सेवा शेंडोबा-माऊली चरणी अर्पण करून अखंड जागर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
-------------
कुणकेरी भावईचा
रविवारी जत्रोत्सव
ओटवणे ः कुणकेरी ग्रामदैवत श्री देवी भावईचा जत्रोत्सव रविवारी (ता. २४) होणार आहे. यानिमित्त सकाळपासून मंदिरात ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता गावपंच, मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत श्री देवी भावईचे घराकडून वाजतगाजत श्रींच्या पालखीचे श्री देवी भावई मंदिराकडे आगमन होणार आहे. रात्री ११ वाजता ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, गावपंच, मानकरी, ग्रामस्थ, भाविक यांच्या उपस्थितीत तरंग-काठी, अब्दागिर, निशाणासह मंदिराभोवती श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १२ वाजता आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ (आरवली) यांचे दशावतारी नाटक होणार आहे. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता मंदिरात गाडगे फोडून दहिकाला (जत्रोत्सव) होणार आहे.
---------------
कुडाळ येथे रविवारी
तालुका वाचक स्पर्धा
कुडाळ ः (कै.) विजया वामन पाटणकर वाचनालयामार्फत (तालुका ग्रंथालय, कुडाळ) २४ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता येथील वाचनालयात तालुकास्तरीय वाचक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी ‘जयवंत दळवी यांची एक साहित्यकृती’ यावर दहा मिनिटे सादरीकरण करायचे आहे. तालुकास्तरीय स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००, द्वितीय ३०० व तृतीय २०० रुपये तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी २३ नोव्हेंबरपर्यंत वाचनालयाशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटणकर यांनी केले आहे.
----------------
उभादांडा येथे भक्तांची
गणपती दर्शनास गर्दी
वेंगुर्ले ः उभादांडा (ता.वेंगुर्ले) येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरात सोमवारी (ता. १८) संकष्टीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. संकष्टी चतुर्थी असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी पूजा झाल्यानंतर केळी, नारळ ठेवणे, नवस फेडणे यासाठी भाविकांची रांग लागली होती. शहरातून तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातून भाविक दर्शनासाठी आले होते. वेंगुर्ले-गोवा मुख्य मार्गानजीक उभादांडा येथे हे गणपतीचे मंदिर असून, दिवाळीला लक्ष्मीपूजनादिवशी या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. दर महिन्यात संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी व इतर दिवशी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.
---
ओटवणे येथे आज
रवळनाथ जत्रोत्सव
ओटवणे ः जिल्ह्यातील जागृत देवस्थान तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओटवणे येथील सातेरी- रवळनाथ पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २०) होत आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर आणि सचिव रमेश गावकर तसेच देवस्थानच्या सर्व मानकऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.