संगमेश्वर ग्रामीण भागातील प्रेक्षकांना नाटकांची प्रतीक्षाच
तेरा वर्षात नाट्यप्रयोग नाही; बीग बजेट मुळे प्रयोग अशक्य
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ः कोकणात गावागावामधील प्रेक्षकांना नाटकांची कमालीची आवड आहे. एकेकाळी बैलगाडीने प्रवास करीत संगमेश्वर येथील माजी विद्यार्थी रंगमंचावर नाटक पाहण्यासाठी रसिक येत होते. मागील तेरा वर्षात एकही नाटक या रंगमंचावर झाले नाही. कलाकारांचे वाढलेले मानधन आणि वाढते खर्च यामुळे नाट्यप्रयोगांचे बजेट वाढले आहे. परिणामी तोटा सहन करण्यापेक्षा नाट्यसंयोजकांनी शहरांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नाट्य प्रयोग करणे बंद केले आहे. त्याचा फटका रंगभूमीशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या कोकणच्या नाट्यवेड्या रसिकांना बसत आहे.
ग्रामीण भागातील जत्रा अथवा अन्य उत्सवाची सांगता आजही स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगांनी होत असते. केवळ कौटुंबिकच नव्हे तर, संगीत नाटकांतील गाजलेल्या अजरामर नाटकांचे प्रयोग सादर करण्याचे धाडस रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असणारे कलाकार करत असतात. मराठी रंगभूमीला कोकणने नामवंत कलाकार दिले. यासर्व कलाकारांनी आपल्या गाजलेल्या भूमिकांतून नाटक सातासमुद्रापार नेले. हेच कलाकार ज्यावेळी कोकणात प्रयोग सादर करायला येत असत त्यावेळी त्यांच्या मनात रंगभूमी विषयी कृतज्ञता असे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या रंगमंचावर अनेक नाटके गाजली असून त्याकाळच्या प्रेक्षकांच्या मनात त्या आठवणी आजही ताज्या आहेत. ग्रामीण भागातील नाटक सादर होण्याच्या उत्साहात देखील आता घट होवू लागली आहे.
संगमेश्वर तालुक्यात खुद्द संगमेश्वर येथे व्यापारी पैसा फंड संस्थेचे माजी विद्यार्थी रंगमंदिर हा रंगमंच आहे . याची उभारणी संस्थेने १९६९ साली केली. त्या सालापासून सुरु झालेली या रंगमंचावरील नाटके अगदी २०११ पर्यंत जवळजवळ ४० ते ४२ वर्षे सुरु होती. अनेक दिग्गज कलाकारांनी या रंगमंचावर आपल्या अजरामर भूमिका सादर केल्या. आता मात्र प्रेक्षकांना या रंगमंचावर नाटक पाहायला मिळणे अशक्य झाले आहे. पूर्वी आर्केस्ट्रा आणि जादूचे प्रयोग वर्षातून किमान एक दोन वेळा तरी येत असत. आता ते देखील येत नसल्याने संगमेश्वर येथील माजी विद्यार्थी रंगमंदिराला करमणूकीच्या प्रयोगांची प्रतिक्षाच करावी लागत आहे. सहा वर्षांपूर्वी पर्यंत दरवर्षी हमखास पोलीस मदत निधीसाठी प्रयोग होत होते. आता हे प्रयोग देखील काही कारणाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत घेणे बंद करण्यात आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी देवरुख येथे पित्रे प्रायोगिक कलामंच हे कै. बाळासाहेब पित्रे यांनी उभारलेले नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह बंदीस्त असले तरी, याची आसन क्षमता कमी असल्याने मोठ्या बजेटचे नाटक येथे लावणे संयोजकांना परवडत नाही. परिणामी देवरुख येथेही नाट्यप्रयोग होत नाहीत.
कोट
कोकणात जवळपास २५ वर्षे आपण नाट्य व्यवसाय केला. येथील प्रेक्षक खूपच नाटक वेडा असल्याने घरातील पूर्ण कुटूंबच नाटकांना लोटत असे. त्याकाळी नाटक निर्मितीचा खर्च, कलाकारांचे मानधन आणि अन्य खर्च आवाक्यात होते. कालांतराने कलाकारांच्या मानधनात कमालीची वाढ झाली आणि नाटक निर्मितीचे तसेच अन्य खर्च वाढल्याने पूर्वी १८ ते २० हजारात होणारा नाट्यप्रयोग आता ८० हजार ते एक लाखाच्या घरात गेला. खेड, चिपळूण येथील नगरपालिका नाट्यगृह बंद असल्याने सलग प्रयोग करुन नुकसान भरुन काढता येत नाही.
- विकास पावसकर, नाट्य संयोजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.