कोकरे गटामुळे निकमांचा विजय सुकर
विरोधकांकडे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा अभाव
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २९ : चिपळूण विधानसभा मतदार संघात बाराव्या फेरीपर्यंत पिछाडीवर असलेल्या शेखर निकम यांना कोकरे जिल्हा परिषद गटात २ हजार ४२३ मतांची आघाडी मिळाली. या गटात कुटरे गणात सर्वच बूथवर निकम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत यादव यांच्यापेक्षा अधिकची मते घेतली. त्यामुळे निकम यांचा विजय सुकर झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. यादव यांच्याकडे कार्यकर्त्यांची दुसरी फळी नसल्याचेही दिसून आले.
कोकरे जिल्हा परिषद गटातील कोकरे गणात असुर्डे, आंबतखोल, हडकणी या गावातील चार गणात झालेल्या २२८१ मतदानापैकी यादव यांना ८८१ तर निकम यांना ११८८ मते पडली. यामध्ये केवळ हडकणी गावात यादव यांना ४९ मताधिक्य मिळाले. कुटरे गणात मुंढेतर्फे सावर्डा, डेरवण यातील तीन बूथवर यादव व निकम यांनी बरोबरीने मते घेतली. दुर्गवाडी बूथवर यादव यांना केवळ ५० मते मिळाली तर निकम यांनी ३५५ मते घेतली. यामध्ये कोसबी, फुरूस, दुर्गवाडी खुर्द, तळवडे, कुटरे, येगाव, नांदगाव, कुशिवडे या गावातील बूथवर निकम यांनी यादव यांच्यापेक्षा ५० ते २०० मताची आघाडी घेतली. या गणातील १५ बूथवर यादव यांना २ हजार ८८८ मते पडली तर निकम यांनी ५००४ मते घेऊन आपल्या निर्णायक आघाडीला सुरवात केली. या गटात शिवसेना शिंदे गट व राष्टवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही गटतट न मानता निकम यांच्या वैयक्तीक करिष्म्यावर काम करून निकम यांना मताधिक्य मिळवून दिले. यामध्ये मागासवर्गीय समाजाचे कार्यकर्ते मागे राहिले नाहीत. उलट यादव यांच्याकडे कार्यकर्त्यांची वानवा होती. यादव यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे रमेश कदम यांना मानणारे काही मोजके कार्यकर्ते गटात कार्यरत आहेत; परंतु ते यादव यांना आघाडी मिळवून देऊ शकले नाहीत. निकम यांचे विनयशील नेतृत्व, पाच वर्षात गटात केलेली विकासकामे, लाडकी बहीण योजना आदींमुळे निकम यांना मताधिक्य मिळाले. यामधूनच निकम यांचा विजय साकार झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.