29375
सोनाळीवासीयांचा ‘महावितरण’ला घेराओ
अधिकारी धारेवरः विजपुरवठा विस्कळीत झाल्याने आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ः सोनाळी गावातील विजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आज घेराओ घातला. कमी-अधिक दाबामुळे नादुरूस्त झालेल्या विद्युत उपकरणाची भरपाई कोण भरून देणार? असा प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सोनाळी गावात गेल्या काही दिवसांपासून विज पुरवठा विस्कळीत आहे. कधी अधिक तर कमी दाबाने विजपुरवठा होतो. त्यामुळे गावातील अनेकांची विद्युत उपकरणे नादुरूस्त झाली. यासंदर्भात गावातील ग्रामस्थांनी महावितरणशी संपर्क साधला. परंतु, त्याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. त्यामुळे संतप्त झालेले ग्रामस्थांनी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महावितरणचे कार्यालय गाठले. यामध्ये माजी सभापती अरविंद रावराणे, सरपंच भीमराव भोसले, प्रकाश शेलार, नितेश शेलार, अशोक रावराणे, संदीप शिंदे, सचिन तळेकर, संदीप कदम, समाधान जाधव, बाबा कोदे यांचा समावेश होता. ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे गावातील विज पुरवठ्याबाबत विचारणा केली. ग्रामसभेच्या ठरावाची देखील दखल घेतली जात नाही, हा काय मुजोरपणा आहे? अनेकांची विद्युत उपकरणे नादुरूस्त झाली आहेत. त्याची भरपाई कोण भरून देणार?, महावितरण कार्यालयातील फोन का सुरू नाही? गावातील वायरमन गावात वेळेत येत नाहीत, अशा प्रश्नांचा भडीमार करीत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. गावात सतत विज पुरवठा खंडित असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजनेवर त्याचा परिणाम झाला आहे. अधिकारी कुणीही फोन उचलत नाहीत; मग ग्रामस्थांनी कुणाकडे तक्रार करायची? असा प्रश्न देखील उपस्थित केला. गावातील सर्व विजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मरवर झाडीझुडपे वाढली आहेत. परंतु, त्याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे तातडीने गावातील विज समस्या सोडविण्यात याव्यात; अन्यथा यापेक्षा अधिक मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी कुमार चव्हाण यांनी लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.