30168
निलंबन सुनावणी होत नसल्याने
‘एसटी’चे कामगार आक्रमक
विभाग नियंत्रकांकडून दिलगिरीची मागणी
कणकवली, ता. ७ : एसटीचालकाच्या निलंबन प्रकरणाची सुनावणी घेण्यात तीन महिन्यांपासून टाळाटाळ होत आहे, तर आज त्या कामगाराला दिवसभर ताटकळत ठेवले. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी आज एसटी विभाग नियंत्रण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. विभाग नियंत्रकांनी दिलगिरी व्यक्त करून सुनावणी लवकर घ्यावी, अशीही मागणी कामगारांनी केली.
विजयदुर्ग आगारात चालक म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी नासिर अहमद पठाण याच्याकडून ७ सप्टेंबर २०२४ ला तळेरे येथे एसटीला अपघात झाला होता. त्यानंतर त्या चालकाचे निलंबन केले. हे निलंबन उठविण्यासाठी प्रथम २९ सप्टेंबरला सुनावणी घेतली होती. मात्र, अधिकारी अन्य बैठकीला असल्याने सुनावणी झाली नाही. त्यानंतर ५ डिसेंबरला पुन्हा सुनावणी घेतली. या दिवशीही अधिकारी उपस्थित नसल्याने आज (ता.७) सुनावणी घेतली. त्यासाठी निलंबित चालक नासिर पठाण हे विभाग नियंत्रक कार्यालयात सकाळी ८ वाजल्यापासून उपस्थित होते, मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांच्या निलंबन सुनावणीसाठी एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे पठाण यांनी ही बाब एसटीसेवा शक्ती कामगार संघटनेचे सचिव अशोक राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर एसटी कामगारांनी एकत्र येऊन विभाग नियंत्रक कार्यालयात ठाण मांडले. सायंकाळी उशिरापर्यंत विभाग नियंत्रक आपल्या कार्यालयात आलेच नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकारी कार्यालयात येऊन सुनावणीप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार अशोक राणे, रोशन तेंडुलकर आदी कामगारांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.