लांजा बसस्थानकात धुळीचे साम्राज्य
प्रवाशांना त्रास; एसटी विभागाकडून दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः लांजा बसस्थानकातील ग्राउंडचे काँक्रिटीकरण केले; मात्र वर्षभर काँक्रिटीकरणावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून त्याचा त्रास प्रवाशांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात साचलेल्या धुळीकडे संबंधित एसटी विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकासमोरील काँक्रिटीकरणाचे काम अगदी गाजावाजा करत सुरू झाले; मात्र धुळीच्या लोटामुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणेकडून प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. लांजा बसस्थानक गेली अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे. बसस्थानकातील खड्ड्यांमुळे प्रवाशी व एसटी चालकांना कसरत करावी लागत होती. बसस्थानकातील आवाराच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे काँक्रिटीकरणासाठी प्रयत्न केले. अखेर किरण सामंत यांनी लांजा एसटी बसस्थानकासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे लांजा बसस्थानकाचे काँक्रिटीकरण पूर्णत्वाला गेले आणि लांजा बसस्थानक खड्डेमुक्त झाले. बसस्थानक आवार काँक्रिटीकरणासाठी एक कोटी रुपये खर्च झाले; मात्र काँक्रिटीकरण होऊन आठ महिने झाले असून बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीचा त्रास शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशी, नागरिकांना सहन करावा लागत आहे. बसस्थानकात बस आल्यानंतर व हवाद्वारे धुळीचे लोट पसरत आहेत. त्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात उभे राहणे मुश्किल होऊन बसले आहे. लांजा बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणावर पसरलेली धूळ साफ करणार कोण..? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
-----
कोट
लांजा बसस्थानक आवारात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. येत्या आठ दिवसांत बसस्थानक आवार स्वच्छ न केल्यास प्रवाशांना सोबत घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.
- दत्ता कदम, माजी सभापती, पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.