ताम्हाणे-आंबवली रस्ता
बनला धोकादायक
देवरुख ः संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे ते आंबवली मराठवाडी रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ते चुकवण्याचे आव्हान वाहनचालकांपुढे असते. या मार्गावरून विद्यार्थी, नोकरदार व रुग्ण, वयोवृद्ध मंडळी सतत ये-जा करत असतात. एसटी फेऱ्या ही या मार्गावरून सुरू आहेत. या मार्गाची अक्षरशः दूरवस्था झाली असून, खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित यंत्रणेने याकडे वेळीच लक्ष घालून हा मार्ग वाहतुकीस सुखकर करावा, अशी मागणी होत आहे.
---
बुटाला हायस्कूलमध्ये
विज्ञान मेळावा
गावतळे ः श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गावतळे येथे अपूर्व विज्ञानमेळाव्याला प्राचार्य बी. बी. सावंत यांच्या संकल्पनेतून झाले. याचे उद्घाटन पंचक्रोशी स्कूल कमिटी अध्यक्ष एन. वाय. पवार, प्रदीप म्हाब्दी, सरपंच विधी पवार यांच्या उपस्थितीत झाले. विज्ञानशिक्षक राहुल बडे, विवेकानंद केसरकर यांनी नावीन्यपूर्ण अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृती साकारल्या होत्या. मोठ्या गटातून अथर्व मळेकर ग्रुप, द्वितीय आयुष पड्याळ, तृतीय अनुजा पवार. लहान गटातून प्रांजल घडवले, श्रद्धा पवार, श्रुती भुवड यांनी क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून वाकवली हायस्कूलचे अविनाश कुंभार व उमा शहा यांनी काम पाहिले.
-------
कविता लेखन स्पर्धेत
बेग द्वितीय
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अॅड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका आरजू महंमद खालिद बेग व विद्यार्थिनी समीक्षा संदीप पवार यांनी जिल्हा व विभागस्तरावर यश संपादन केले आहे. प्रा. बेग यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४ मध्ये कविता लेखन स्पर्धेत द्वितीय तर कथाकथन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सांगली येथील बालगंधर्व नाट्यगृहात झालेल्या विभागस्तरीय कथालेखन स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. १२वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेली समीक्षा पवार हिने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४ मध्ये हस्तकला स्पर्धेत गवताची परडी आणि गवताचे कीचेन बनवून तृतीय क्रमांक पटकावला.
--------
देवरूखमध्ये २३ला
कबड्डी स्पर्धा
साडवली ः देवरूख दत्तनगर बालमित्रमंडळ सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव होणार असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप बोथले यांनी पत्रकार परिषदेत दिली. २१ ला संध्याकाळी ७ वाजता जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. १६ नामवंत संघ सहभागी होणार आहेत. २२ ला सकाळी १० वा. शाळा नं. ३ येथे तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा होणार आहेत. पहिली ते चौथी व पाचवी सातवी अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. २३ ला सकाळी १० वा दत्तनगर येथे रक्तदान शिबिर होणार आहे. २४ ला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २५ ला सकाळी शोभायात्रा, पूजा, महाप्रसाद व रात्री बहुरंगी पौराणिक नमन होणार आहे. महोत्सवात रणजी क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी आणि मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
---
‘कलाकृतींना बाजारपेठ
मिळवून द्या’
संगमेश्वर ः व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरने मुंबई-गोवा महामार्ग लगत उभारलेले पैसाफंड कलादालन हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना पाहण्याची एक उत्तम संधी असून, संस्थेने येथील कलाकारांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळवून द्यावी त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सिंधू रत्न समिती नक्की करेल, असे आश्वासन समितीचे पदाधिकारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिले. व्यापारी पैसाफंड संस्था संगमेश्वरच्या प्रशालेला आणि कलादालनाला आज त्यांनी सदिच्छा भेट दिली. येथील माजी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या कलाकृती अविश्वसनीय आहेत. येथील माजी विद्यार्थ्यांसह कलाकारांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळाली पाहिजे, यासाठी प्रशालेजवळच एक विक्रीकेंद्र सुरू करण्याची सूचनादेखील जठार यांनी केली. कलादालनातील काही विशेष कलाकृती आणि कलाकारांबाबत जठार यांनी अधिक माहिती जाणून घेतली. या वेळी पैसाफंडचे सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.