swt1122.jpg
30994
सिंधुदुर्गनगरी ः येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना रणजित देसाई. सोबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे.
भाजपतर्फे एक लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट
रणजित देसाई ः सिंधुदुर्गात बुथनिहाय विशेष नियोजन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः भाजप पक्षाचे सध्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानात सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पूर्ण जिल्ह्यात तीन लाख सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप सदस्य नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदस्य नोंदणी अभियानाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात भाजपची पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस तथा अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात भाजपची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे. त्यानुसार खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे."
ते पुढे म्हणाले, "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला भरघोस मतदान केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवमतदार आहेत. परंतु, ते सदस्य नाहीत, अशा नवमतदार आणि भाजप प्रेमींना सदस्य करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान बुथनिहाय यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. आमचे पदाधिकारी प्रत्येक बूथवर जावून मतदारांचे आभार मानणार आहेत. मतदारांच्या अपेक्षा जाणून घेणार आहेत. तसेच ही नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्याने केंद्र आणि राज्याने राबविलेल्या योजनांचा लाभ या सदस्यांना मिळवून देताना आम्हाला उपयोग होणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेत महायुतीच्या उमेदवाराला तिन्ही मतदारसंघात प्रत्येकी सरासरी ८० ते ८५ हजार एवढी मते मिळाली आहेत. त्यामुळे यात अधिक वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान एक लाख सदस्य नोंदणी केली जाणार आहेत. पुढील १५ ते २० दिवसांत ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ मंडळ स्तरावर स्वतंत्र संयोजन समिती नियुक्ती करण्यात आली आहे."
--------------
चौकट
असा मिळणार सदस्य नोंदणी क्रमांक
जिल्हास्तरावर यासाठी श्री. देसाई यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समिती नियुक्ती करण्यात आली आहे. यात महेश सारंग, संदीप साटम सह संयोजक आहेत. महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, केशव नवाते यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील ९२१ बुथवर किमान ३०० तसेच नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले गेले आहे. जे जुने सभासद आहेत, त्यांना मिस कॉल दिल्यावर जुना आयडी नंबर येणार आहे. मात्र, नव्याने सभासद होणाऱ्या मतदाराने मिस कॉल दिल्यावर त्यांना टेक्स मॅसेज येणार आहे. त्यात एक लिंक येणार आहे. ती लिंक ओपन करून माहिती भरल्यावर सदस्य नोंद झाल्याचा आयडी क्रमांक मिळणार आहे, असे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.