जामसंडेत चोरट्यांनी
दोन बंद घरे फोडली
छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ ः जामसंडे विष्णूनगर परिसरात दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली. याबाबत काल (ता. ६) उशिरा येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली.
कुडाळ, कणकवली, वैभववाडी तालुक्यानंतर आता देवगड तालुका चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसते. नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून बंद घरे, बंद सदनिका चोरट्यांकडून फोडली जातात. जामसंडे विष्णुनगर भागात घरे एकमेकांना लागून आहेत. अशा भरवस्तीत चोरट्यांनी दोन बंद घरे लक्ष्य केली. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज आहे. यामुळे आता घर बंद करून जाणाऱ्यांना भीती वाटू लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे विष्णुनगर परिसरात राहणारे संबंधित कुटुंब घर बंद करून बाहेरगावी गेले होते. हीच संधी चोरट्यांनी साधली. मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील रोख तीन हजार रुपये, तसेच सुमारे दोन हजार रुपये किंमतीची चांदीची गणेशमूर्ती चोरून नेली. घरातील साहित्य विस्कटले होते. दरम्यान, या घराजवळच राहणारे अन्य एक कुटुंब बाहेरगावाहून आल्यावर त्यांनाही आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या घराचाही कडीकोयंडा उचकटून चोरट्याने घरातील रोख दहा हजार रुपये पळविले. तपासासाठी श्वान, तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. हवालदार उदय शिरगावकर तपास करीत आहेत. पोलिसांनी आज परिसरात तपास केला. दरम्यान, अलीकडेच येथील बसस्थानक परिसरात एक दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. खाडीकिनारी पान दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला होता. आता जामसंडे येथे भरवस्तीत चोरट्यांनी दोन बंद घरे फोडल्याने भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात चोरीच्या घटना घडल्यावर तपासासाठी श्वान आणले जाते. मात्र, अलीकडे बहुतांश वेळा चोरटे वाहनाचा वापर करीत असल्याने तपासावर काहीशा मर्यादा येतात. शहरातील घरे, इमारती, विविध आस्थापने यावर सुरक्षिततेसाठी लावण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा सार्वजनिक भागाकडे वळवलेला असल्यास पोलिसांना त्याची मदत होऊ शकेल. परराज्यातून येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवणेही आता गरजेचे झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.