नाशिकमधील खैर गुजरातमार्गे सावर्डेत
दहशतवादासाठी अर्थपुरवठा? ; राजकीय दबावाची चर्चा फोल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : नाशिकच्या सरकारी जंगलातून तोडलेला खैर गुजरातमध्ये विकण्यात आला. तो गुजरातमार्गे पुन्हा सावर्डे परिसरातील कात व्यवसायिकांना विकण्यात आला. या तस्करीतून झालेला आर्थिक व्यवहार दहशतवादी कारवायांसाठी बळ देत असल्याचा संशय गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाला आहे. नाशिकमधील खैर गुजरातमार्गे सावर्ड्यात आल्यामुळे येथील कात व्यवसायिक चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
नाशिक आणि गुजरात वनविभागाचे अधिकारी सावर्डे गावात येऊन येथील कात व्यवसायिकांवर कारवाई करतात. गुजरात एटीएसनेही या कारवाईमध्ये सक्रियता दाखवली. यामध्ये राजकीय नेत्याचा हात आहे का? अशी चर्चा सुरू होती. कारण, सावर्डे परिसरातील कात व्यवसायिक कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत. काहीजण राजकीय दबाव वापरून हा व्यवसाय करत असल्याची चर्चा होती. मध्यंतरी झालेल्या निवडणुकांमध्ये या भागातील काही कात व्यावसायिकांनी आपली प्रमुख भूमिका बजावली. कुणी विरोधात मतदान केले तर कोणी आर्थिक रसद पुरवली अशी चर्चा आहे. याबाबत नाशिकचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजकीय दबावाचा विषय फेटाळून लावला. गुजरातमधील एका फळविक्रेत्याने नाशिकमधून गुजरातमध्ये खैराची तस्करी केली आणि पुन्हा ते खैर सावर्डे (ता. चिपळूण) भागातील कात व्यावसायिकांना विकले. हे आमच्या तपासामध्ये उघड झाले. आमचे पथक चिपळूणला चौकशीसाठी आल्यानंतर मी काही कात व्यावसायिकांची माहिती काढली होती. यातील काहीजण आमच्याकडे चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे संशय बळावला आणि आम्ही पुढील कारवाई केली. यामध्ये काही व्यावसायिकांकडे कात उत्पादन करण्याचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुढील तपास गुजरात वनविभाग आणि महाराष्ट्राचा वनविभाग संयुक्तपणे करणार आहे. एका फळविक्रेत्याने खैर तस्करीतून मिळवलेला पैसा दहशतवादी कारवाईसाठी वापरल्याचा संशय आहे. त्यामुळे गुजरात वनविभाग आणि महाराष्ट्राचा वनविभाग संयुक्तपणे या संदर्भात चौकशी करत आहे, असे माळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.