39486
विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक
जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांना निवेदन; २६ ला उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः पंतप्रधान फळ पीक विमा योजनेत सहभागी आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात आहे. २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील सर्वच आंबा, काजू बागायतदारांना लहरी हवामानाचा फटका बसून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र तालुक्यातील सावंतवाडी, निरवडे तसेच कुडाळ तालुक्यातील गोठोस, ओरोस बुद्रुक व दोडामार्ग तालुक्यातील तळकट अशा पाच मंडळांतील सुमारे १२ कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना विमा परतावा अद्याप मिळालेला नाही. येत्या २२ जानेवारीपर्यंत परतावा न मिळाल्यास २६ ला प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा आंबा बागायतदार संघटनेकडून देण्यात आला. याबाबतचे निवेदन संघटनेच्यावतीने जिल्हा कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, २०२३-२४ मध्ये जानेवारी ते मे दरम्यान अवकाळी पाऊस तसेच अति तापमान व त्यातच फळमाशीचा प्रादुर्भाव यामुळे आंबा पिकामध्ये लक्षणीय अशी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले होते. वर्ष उलटून गेले तरीही निरवडे मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत विमा परतावा जमा झाला नाही. आंबा बागायतदार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर कृषी विभागाने वारंवार संबंधित विमा कंपनीशी पत्र व्यवहार करूनही कंपनीने याची दखल घेतली नाही. २०२४ चा फळपीक विमा परतावा वेळेत न मिळाल्याने २०२४-२५ च्या विम्यामध्ये काही शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे सावंतवाडी व निरवडे मंडळांतील शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५६ मंडळांपैकी ५१ मंडळांतील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळाला आहे; मात्र सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी व निरवडे तसेच कुडाळ तालुक्यातील गोठोस व ओरोस बुद्रुक, दोडामार्ग तालुक्यातील तळकट अशा मंडळांतील सुमारे १२ कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना विमा परतावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून, २२ जानेवारीपर्यंत फळ पीक विमा परतावा न मिळाल्यास २६ ला आत्मदहनाचा इशारा निरवडे मंडळातील शेतकऱ्यांनी दिला आहे. यात विमा कंपनीने ५१ मंडळांना आदा केलेली विमा नुकसान कोणत्या ‘जीआर’प्रमाणे दिली आणि पाच मंडळे कोणत्या निकषाआधारे वंचित ठेवली, त्याचा लेखी खुलासा कंपनीने द्यावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांचा विमा कंपनीवर वचक नसल्याने आज आत्मदहनाची वेळ कोकणातल्या शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून देण्यात आली.
याबाबतचे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी आंबा बागायतदार संघटनेच्या उपाध्यक्षा दिव्या वायंगणकर, सदस्य व शेतकरी दाजी तुळसकर, सूरज डिचोलकर, रमेश नाईक, प्रताप चव्हाण, सीताराम घोगळे, बाबुश घोगळे, सुभाष राऊळ, जालंधर परब, शंकर राऊळ, नागेश गावडे, भरत सुभेदार आदी शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.