बांगलादेशी महिलेकडे जन्मदाखला, मालमत्ताही
प्रशासकीय यंत्रणा कामाला : पाच दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : शहरातील साळवी स्टॉप येथे मिळालेल्या बांगलादेशीय महिलेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दहशतवादीविरोधी पथक आणि शहर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये भारत देशातील रहिवासी असल्याचे अनेक पुरावे तिने तयार केले आहेत. धक्कादायक माहिती पुढे येते की, जन्मदाखला मिळवून मालमत्तादेखील नावावर केल्याचे समजते. या गंभीर प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा एटीएस आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
रत्नागिरी तालुक्यासह अनेक ठिकाणी बांगलादेशीय नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करून असल्याचा प्रकार यापूर्वी उघड झाला आहे तसेच काहींना जन्मदाखले दिल्याचे प्रकरण सुरू आहे. या सर्व घडामोडीमध्ये रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे एक बांगलादेशीय महिला राहात असल्याचे पुढे आले. या महिलेचे बांगलादेशातील नाव समला मुल्ला आहे तर रत्नागिरीत नाव सलमा राहिल बोंबल (वय ३०) असे आहे. या बांगलादेशीय महिलेला एटीएस आणि शहर पोलिसांनी काल पकडले. एटीएसचे अनेक दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. काल ही कारवाई करण्यात आली. तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. साळवी स्टॉप येथील महिलेबाबत माहिती मिळाल्यानंतर काल ही कारवाई केली.
ही महिला मुंबईत वास्तव्याला होती. सावर्डे (ता. चिपळूण) येथील राहिल बोंबल याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे लग्न झाले आणि ती रत्नागिरीत राहायला आली. गेली पाच वर्षे ती येथे वास्तव्याला आहे. या कालावधीत तिने आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड आदी शासकीय पुरावे तयार केले आहेत. या महिलेचा जन्मदाखलादेखील रत्नागिरीत असल्याचे समजते तसेच तिच्या नावावर प्रॉपर्टी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एटीएस आणि पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. लवकरच सत्य पुढे येणार आहे.
आणखी एक प्रकरण...
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये या महिलेशी संबंधित आणखी एक महिला जिल्ह्यात राहात आहे; परंतु सध्या ती बाहेरगावी आहे. ती आल्यानंतर आणखी एक बांगलादेशीय महिला जिल्ह्यात राहत असल्याचे उघड होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.