कलमठमध्ये ‘वन’तर्फे
माकड पकड मोहीम
कणकवली ः कलमठ ग्रामपंचायत आणि सावंतवाडी वनविभाग यांच्यावतीने कलमठ गावात माकड पकड मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, सचिन खोचरे, सावंतवाडी वनविभागाचे जलद बचाव प्रमुख अनिल गावडे, दिवाकर बांबर्डेकर, वैभव आमडोस्कर, प्रसाद गावडे, ग्रामपंचात कर्मचारी खुशाल कोरगावकर, रमेश चव्हाण, अण्णा सावंत उपस्थित होते.
हॅकेथॉन स्पर्धेमध्ये
मठ केंद्रशाळेचे यश
वेंगुर्ले ः स्टार्स प्रकल्पांतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत प्राथमिक गटातून येथील (कै.) रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ क्र. १ शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व खासगी अनुदानित शाळांमधील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. हॅकेथॉन स्पर्धेसाठी प्राथमिक स्तरासाठी प्रतिकृतींची निवड करण्यात आली होती. कसाल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही स्पर्धा झाली. मठ केंद्रशाळेने या हॅकेथॉनसाठी ''सौर ट्रॅकर'' ही प्रतिकृती सादर केली. याचे सादरीकरण काशिनाथ तेंडोलकर व सुयश नांदोस्कर या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर, गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.
सायबर गुन्ह्यांबाबत
शिरवलमध्ये जागृती
कणकवली ः शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अँटी-रॅगिंग सेलतर्फे पोक्सो कायदा, सायबर गुन्हे आणि पीडित भरपाई योजना याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. अर्चना गवाणकर व अॅड. चैताली मुंज यांनी सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा करावा, पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी तसेच विद्यार्थ्यांनी जागरुकता कशी बाळगावी, यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या मेघा बाणे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. राजेश जगताप, विभागप्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर, प्रा. अमर कुलकर्णी आणि डॉ. अमोल उबाळे यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एस. डी. कदम, प्रा. पी. पी. राणे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थाध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्षा स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त मंदार सावंत यांनी कौतुक केले.
जलतरण स्पर्धेमध्ये
शमिकाला सहा पदके
सिंधुदुर्गनगरी ः गोवा येथे झालेल्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत कुडाळच्या शमिका चिपकरने सहा पदकांची कमाई केली. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सांगोल्डा द आर्डी स्कूल आणि फिट फॉर लाईफच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे २५ वी वार्षिक आंतरशालेय जलतरण चॅम्पियनशिप नुकतीच झाली. त्यात ६० शाळांच्या मुलांनी सहभाग घेतला. यात सध्या गोवा-म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर येथे शिकत असलेल्या कुडाळ येथील शमिका चिपकर हिने तीन गोल्ड, दोन सिल्व्हर, दोन ब्राँझ पदके पटकावली. ती आता खेलो इंडिया, गोवा येथे जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल आमोणकर विद्यामंदिरच्या शिक्षक वृंदाने विशेष कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.
जिल्हा क्रीडा स्पर्धेत
गेळे शाळा अव्वल
आंबोली ः जिल्ह्यात यावर्षीही क्रीडा प्रकारात मोठ्या गटात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गेळे क्र. १ चा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेता ठरला. सर्वच स्तरातून विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. या शाळेची विद्यार्थिनी स्वराली गवस आणि अनिशा गवस यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावून शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून दिला. या गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अनंत राऊत, उपशिक्षक सुहास गावडे, उपशिक्षक कुंडलिक पाटील, पदवीधर शिक्षिका ज्योती देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. आंबोली-चौकुळ केंद्राचे केंद्रप्रमुख आर. बी. गावडे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.