दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप
२४ पासून तपासणी शिबिरे; खासदार नारायण राणेंची संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्यावतीने दिव्यांग योजना व वयोश्री या भारत सरकारच्या योजनेंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपाकरिता तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. दिव्यांग व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात जिल्हा प्रशासनाने केले आहे.
एडीप योजनांतर्गत अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, कर्णबधीर, पूर्णतः अंध, क्षीण दृष्टी, कुष्ठरोग निवारित, बौद्धिक अक्षम या प्रकारच्या दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, बॅटरीवर चालणारी मोटराइज्ड तीनचाकी सायकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, सीपी चेअर, रोलेटर, बीटीई श्रवणयंत्र, ब्रेलकेन, ब्रेलस्लेट, ब्रेलकीट, सुगम्य केन, स्मार्टफोन, कृत्रिम अवयव, जेल कुशन, कॅलिपर दिले जाणार आहे. यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र, आधारकार्ड झेरॉक्स, उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत, अंध दिव्यांग लाभार्थ्यांच्याबाबतीत शैक्षणिक नावनोंदणीचा पुरावा, अपंगत्व दर्शवणारा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. वयोश्री योजनेकरिता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक दर्शवणारा पुरावा झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, कमोडसह व्हीलचेअर, कमोड स्टूल, कुबड्या, चालण्यासाठी काठी, ट्रायपॉड, टेट्रापॉड, चष्मा, श्रवणयंत्र, मानेचा पट्टा, गुडघा बेल्ट, दाताची कवळी, कमरेचा पट्टा, पाठीचा पट्टा इत्यादी साहित्य मिळू शकेल.
रत्नागिरीत हे शिबिर २४ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात होईल. राजापूरला २५ रोजी पंचायत समिती किसान भवन, लांजा येथे २७ रोजी आग्रे मंगल कार्यालयात, संगमेश्वरला २८ रोजी देवरूख पंचायत समिती कार्यालयात, चिपळुणात १ मार्च रोजी कामथे ग्रामीण रुग्णालयात तपासणी होणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार, या शिबिरात सर्व लाभार्थींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.