४६१४६
ठाकरे शिवसेनेला आणखी एक धक्का
जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा राजीनामा : शिंदे शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ : सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. या पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पक्षांतर्गत घडामोडींमुळे आज पदाचा राजीनामा दिला. २२ तारखेनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे शिवसेनेला रामराम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार असल्याने आणखी काही धक्के बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अलीकडेच भाजपने घेतलेल्या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आज जिल्हाप्रमुख असलेल्या पडते यांनी राजीनामा दिल्याने या पक्षाला आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी आज कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आतापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
ते म्हणाले, ‘१९८५ पासून शिवसेनेचा साधा शिवसैनिक ते शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी अनेक पदे मला शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली. शिवसेनेचे वाक्य ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत या जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या जिल्ह्यांमध्ये शिवसेना गावागावांत उभी करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली केले. अनेक गावांत शिवसेना शाखा काढून आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम राबवून शिवसेना वाढविली. त्यानंतर या जिल्ह्यामध्ये विद्यमान खासदार माजी मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढविली. शिवसेना वाढविल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती, बांधकाम सभापती अशी अनेक पदे या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. मी जिल्हाप्रमुख म्हणून सुद्धा काम केले.’
पक्षप्रमुख यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी संजय धोंडदेव पडते, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १९८५ पासून बाळसाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. आपल्याच नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. सद्य:स्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल, अशी परिस्थिती नाही. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोंडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा देत आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आपला ऋणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.