swt2517.jpg व swt2518.jpg
47599, 47600
पिंगुळीः ठाकर लोककला महोत्सवात राधा नृत्य सादर करताना दोडामार्ग कोनाळकट्टा येथील कलाकार. दुसऱ्या छायाचित्रात पारंपारिक ठाकर बोलीभाषेत फुगडी सादर करताना महापुरुष महिला मंडळ पिंगुळी गुढीपूरच्या महिला. (छायाचित्रेः अजय सावंत)
‘पिंगुळी महोत्सवा’ची उत्साहात सांगता
विविधांगी लोककलांचे दर्शनः ‘तरवा गीत’ ठरले लक्षवेधी
अजय सावंतः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः पारंपारिक ठाकर लोककलांचे जतन करताना गेले तीन दिवस आदिवासींच्या विविध लोककलांनी पिंगुळी ठाकर लोककला महोत्सव यादगार ठरला. लुप्त होत चाललेले पारंपारिक ‘तरवा गीत’ कलाकार श्रीमती जयवंती मसके (वय ८५) यांनी सादर केले. त्याचबरोबर पारंपारिक गोंधळ, फुगडी, राधा नृत्य, पपेट शो अशा लक्षवेधी लोककलांनी दिमाखात सांगता झाली.
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग संचालनालयाच्यावतीने पिंगुळी-गुढीपूर येथील ठाकरवाडी म्युझियमच्या पटांगणावर ‘पिंगुळी लोककला महोत्सव’चे आयोजन केले होते. तिसऱ्या दिवशी उद्घाटनावेळी ठाकर लोककलाकार गणपत मसगे, ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, रामा ठाकुर, ठाकर समाजाचे ज्येष्ठ नेते मोहन रणसिंग, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष भगवान रणसिंग, पत्रकार शेखर सामंत, भास्कर गंगावणे, विठ्ठल मसके, गुंडू मसके, शिवदास मसगे, बाळकृष्ण मसगे, साईनाथ जळवी, मंगेश मसके, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग, विठ्ठल मसगे, तुलसीदास मसके आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दुर्मिळ व काळाच्या पडद्याआड जाणारा कलाप्रकार तरवा गीत, पारंपरिक राधा नृत्य, गोंधळ व संबळ तुणतुणं वादन, पुरातन अशा चामड्याच्या बाहुल्या आदी लोककलांचा या महोत्सवात सहभाग होता. कोनाळकट्टा (ता. दोडामार्ग) येथील कलावंतांनी
शिमगोत्सवातील राधा नृत्य सादर केले. विशेष म्हणजे हे राधा नृत्य त्यांनी ठाकर बोलीभाषेत सादर करून लोप पावत चाललेल्या या कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कट्टा (मालवण) येथील साईप्रसाद चव्हाण यांच्यासह ठाकर कलाकारांचा पारंपारिक गोंधळ व खुणांची भाषा हा एक नाविन्यपूर्ण व आगळावेगळा कार्यक्रम रसिकांना पाहता आला. खुणांची भाषा ही ठाकर समाजातील एक वैशिष्ट्यपूर्ण अशी भाषा असून या भाषेचा उपयोग शिवकाळामध्ये गुप्तहेरीसाठी केला जायचा हा कलाप्रकार लक्षवेधी ठरला.
पारंपारिक तरवा गीत (श्रीमती जयवंती मसके, पिंगुळी), फुगडी (महापुरूष महिला मंडळ, पिंगुळी-गुढीपुर), कळसुत्री बाहुल्या (सुरेश रणसिंग, पिंगुळी), फुगडी (नवहौशी महिला मंडळ, कोनाळकट्टा-दोडामार्ग) यांनी सादर करून लोककला महोत्सवात रंगत आणली. गेल्या कित्येक वर्षाची तरवा गीत ही पारंपारिक लोककला आजच्या बदलत्या जमान्यात आजही गणपत मसगे व त्यांच्या कुटुंबाने जिवंत ठेवली आहे. हे तरवा गीत श्रीमती जयवंती मसगे यांनी सादर केले. शेतात तरवा लावताना पारंपारिक तरवा गीत लोककला जोपासली जात होती. आता ती लुप्त होत चालली आहे. या लोककलेचा प्रवास निवेदक शिवदास मसगे यांनी सांगितला. निवेदन नागेश नेमळेकर, अमर प्रभु यांनी केले
नगराध्यक्षा बांदेकर - शिरवलकर म्हणाल्या, ‘‘ठाकर समाजाची कित्येक वर्षाची पारंपारिक लोककला या पिंगुळी ठाकर लोककला महोत्सवातून प्रत्यक्ष पाहता आली. आजच्या मोबाईलच्या जमान्यात ही लोककला पाहता येणे हा वेगळाच अनुभव आहे. ठाकर समाजातील विविध लोककलांनी सर्व पातळीवर नावलौकीक मिळवलेला आहे. ही लोककला उत्तरोत्तर अशीच बहरत जावो.’’
समाजाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक मोहन रणसिंग यांनी लोककलाकार गणपत मसगे व कुटुंबीय यांनी ठाकर समाजाच्या लोककलेला पुढे नेण्यासाठी संपूर्ण वाहून घेतले आहे. या कला जोपासताना या लोककलांना नाविन्य लोककलेचे स्वरूप कसे देता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.