वणव्यांमुळे करवंदांची झुडपे होताहेत नष्ट
रानमेवा नामशेष होण्याची भीती; बचतगटांना बसणार फटका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : जंगलाची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांची काटेरी झुडपे वणव्यांमुळे नष्ट होत आहेत. त्यामुळे रानमेव्यातील महत्त्वाची अशी करवंदे नामशेष होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. करवंदांच्या जाळ्या वणव्यात होरपळत असल्यामुळे यावर्षी करवंदापासून बनवण्यात येणाऱ्या लोणचाच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका बचतगटांना बसणार आहे.
गावरान आंबे, जांभळे, करवंदे, अलीव सध्या बाजारपेठेत येताना दिसत आहेत; पण जंगलातील काळी मैना म्हणून नावलौकिक असलेली करवंदे यावर्षी हद्दपार झाल्याचे चित्र आहे. डोंगरदऱ्यात येणाऱ्या याच करवंदांच्या विक्रीतूनच ग्रामीण भागातील व बचतगटाच्या महिलांना रोजगार मिळत असतो. एप्रिल अखेरीस फळे पिकून काळी होत असल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल होतात; पण परिसरातील बहुतेक जमिनी आता विविध प्रकल्प आणि खासगी विकासकांनी घेतल्यामुळे जमिनींवरील जंगलेच नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी झुडपांना समूळ नष्ट करण्यात आले आहे तर काही ठिकाणी सर्पणासाठी झुडपांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे रानमेव्याचा हा प्रकार अखेरच्या घटका मोजत आहे. चिपळूण तालुक्यातील तिवडी, आकले, कादवड, पेढे परशुराम, मार्गताम्हाणे या भागातील महिला बचतगट करवंदापासून ज्यूस आणि विविध प्रकारचे लोणचे बनवतात. परशुराम मंदिराला भेट देण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येणारे परशुराम भक्त करवंदापासून बनवल्या जाणाऱ्या लोणच्याची आवर्जून खरेदी करतात. येथील स्टॉलवरसुद्धा करवंदापासून बनवलेले पेय विक्रीसाठी उपलब्ध असतात. उन्हाळ्यात या पेयाला जास्त मागणी असते. पुण्यातील अनेक चाकरमानी बचतगटांकडून कुरिअरने लोणचे मागून घेतात. यावर्षी करवंदचे पीक कमी आले आहे. त्याचा परिणाम महिला बचतगटाच्या उद्योगावर होण्याची शक्यता आहे.
---
कोट
करवंदांमुळे जीवनसत्व, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शासनाने या फळांच्या ज्यूस उत्पादनाच्या योजना आखल्या आहेत. बचतगटातील महिला करवंदापासून लोणचे बनवतात. यातून चांगली रोजगारनिर्मिती होते. परशुरामच्या डोंगरात मुबलक प्रमाणात करवंद मिळत होती. यावर्षी येथील डोंगराला आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे करवंदाचे उत्पादन कमी झाले आहे.
- स्मिता वारे, परशुराम महिला बचतगट सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.