कुडाळात उद्यापासून
योग उपचार शिबिर
कुडाळ ः पतंजली योग समिती सिंधुदुर्गमार्फत शहरामध्ये संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन गुरुवार (ता. ६) ते सोमवार (ता. १०) दरम्यान होत आहे. सकाळी ६ ते ७.३० या वेळेत दररोज शिबिर होणार आहे. यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, अॅडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नतीबाबत विशेष वर्ग होतील. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. येथील नवीन एसटी डेपोजवळ रविकमल हॉलमध्ये हे शिबिर होणार आहे. सर्व योगाभ्यासप्रेमी पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या निःशुल्क योग शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर, लक्ष्मण पावसकर, विलास परब, राजेंद्र मुळीक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...............
कुडाळात शुक्रवारी
विविध कार्यक्रम
कुडाळ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ नगरपंचायत महिला बालकल्याण विभागाअंतर्गत नगरपंचायत हद्दीतील महिलांसाठी शुक्रवारी (ता. ७) दुपारी २.३० पासून महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरातील महिलांसाठी कोकणातील दुर्मीळ होत चाललेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा, महिलांच्या आरोग्याची काळजी तसेच कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम, ‘माझी वसुंधरा अभियान-५’ अंतर्गत वसुंधरा बचावबाबत मार्गदर्शन, प्रधानमंत्री आवास योजना मार्गदर्शन, नव्याने स्थापन झालेल्या बचतगटांना आवश्यक रजिस्टरचे वाटप करणे, स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. पाककला स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
................
‘ज्ञानी मी होणार’
स्पर्धेत कर्तव्यचे यश
सावंतवाडी ः डॉट कॉम्स असोसिएशन संस्थेमार्फत शिवजयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान व बुद्धिमत्तेवर आधारित ‘ज्ञानी मी होणार २०२५’ परीक्षेमध्ये सातवी व आठवी या गटात येथील आरपीडी प्रशालेचा सातवीतील विद्यार्थी कर्तव्य बांदिवडेकर याने विजेतेपद पटकाविले. त्याला रोख पारितोषिक तसेच आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या यशस्वीतेसाठी कर्तव्यसह मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक एस. एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
................
वेंगुर्ले बालवाडीत
गुणवंतांचा गौरव
वेंगुर्ला ः येथील (कै.) शुभदा अविनाश शेणई बालवाडीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन २७ फेब्रुवारीला साई मंगल कार्यालय येथे झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या मनाली दाभोलकर यांच्या हस्ते झाले. मानसी गावडे, महेश गावडे, उदय मालवणकर, रुपाली हरमलकर, वैभव मालवणकर, शिवन्या चिचकर, सचिता करंगुटकर, भटवाडी शाळा क्र. १ चे शिक्षक विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते. विश्वनाथ जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. (कै.) शुभदा शेणई यांनी सुरू केलेली बालवाडी आज ३५ वर्षांनंतरही अविरत सुरू आहे. गुणवंतांना गौरविण्यात आले. त्यानंतर मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बालवाडीच्या संचालिका रिषा सावळ यांनी स्वागत केले. नितीश कुडतरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला पालक, शिक्षणप्रेमी आणि हितचिंतक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.