‘त्या’ वाघिणीचा मृत्यू बुडूनच
वन विभागाचा अंदाज : सखोल तपास होणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ : तालुक्यातील दाभिल सरमळे गावच्या नदीत आढळलेल्या वाघिणीचा मृत्यू त्या कुंडातून बाहेर येता न आल्याने पाण्यात बुडूनच झाला आहे. तिच्या मृत्यूबाबत संशय घेण्यासारखा काहीच पुरावा परिसरात कुठेच आढळला नाही; तरीही या मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी केली जाणार असून, वन गुन्हा नोंद केल्याचे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी आज स्पष्ट केले. सर्वेक्षणातून पुढे आलेल्या आठ वाघांच्या नोंदीपैकी ही एक वाघीण आहे का, हे सांगता येत नसले तरी तज्ज्ञ यंत्रणेमार्फत तेही जाणून घेण्याचा प्रयत्न असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.
दाभिल सरमळे गावच्या सीमेवर दाट जंगलात सातबांव या नदीत असलेल्या कुंडात (नैसर्गिक विहीर) मृत वाघीण आढळली होती. सातबांव हा परिसर मुख्य गावापासून चार-पाच किलोमीटर आतमध्ये असल्याने या ठिकाणी सहसा कोणी फिरकत नाही. त्यामुळे हा प्रकार तत्काळ उघडकीस आला नाही. वाघीण पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आढळली. वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला व ही वाघीण कुंडात पडली असावी आणि नंतर तिला बाहेर येता न आल्याने मृत झाल्याचा निष्कर्ष काढला.
उपवनसंरक्षक रेड्डी म्हणाले, ‘‘भक्ष्याच्या मागे धावताना वाघीण कुंडात पडल्याची शक्यता आहे. तिला बाहेर येणे अशक्य झाले. पुढील पायांनी वर येण्याचा तिने प्रयत्न केला. तशा नखांच्या खुणाही तेथे आढळल्या; पण मागच्या पायांना आधार नसल्याने तिला पुढे झेप घेता आली नसावी. पाण्यातच अडकून पडल्याने तिचा नंतर मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. पशुवैद्यकीय पथकाने केलेल्या अहवालानुसार कुठल्याही प्रकारची विषबाधाही आढळली नाही. परिसरातही तसा कोणताही पुरावा आढळला नाही. वाघिणीची नखे व दात सुस्थितीत होते. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय घेणे कठीण आहे, तरीही या घटनेची वन विभागामार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. तपासात कोणतीही कसर ठेवणार नाही.’’
कुंडातील पाण्याचे घेतले नमुने
पंचनाम्यानंतर तपासासाठी आवश्यक अवयव व ज्या कुंडात ती आढळली त्यातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. ज्या भागात मृत वाघीण आढळली, तो भाग वन्य प्राण्यांसाठी कसा सुरक्षित करता येऊ शकतो, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सह्याद्री पट्ट्यापासून ते दोडामार्ग तालुक्यातील मांगेलीपर्यंतच्या भागात जेथे वाघांचा अधिवास आहे, त्यांचा भ्रमणमार्ग आहे, तेथे वनगस्त वाढविण्यात येणार आहे. वनकर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देणार आहे. प्रत्येक आठवड्यात कॅमेरा ट्रॅपिंग करून अहवाल घेतला जाणार आहे. आता प्राधान्याने या भागात लक्ष ठेवले जाणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.