सकाळ बातमीचा परिणाम
वृक्ष लागवड मोहीम अखेर थांबवली
सार्वजनिक बांधकामचा निर्णय ः उन्हाळ्यात लागवडीला स्थानिकांतून विरोध
रत्नागिरी, ता. ४ : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (उत्तर) जिल्ह्यातील विविध मार्गावर करण्यात येणारी वृक्ष लागवडीची मोहीम थांबवली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, राजापुरात लावलेली झाडे उन्हामुळे करपून जात आहेत. यामुळे लाखो रुपये खर्च करून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा फज्जा उडण्याच्या शक्यतेने बांधकाम विभागाने वृक्ष लागवड थांबवली असून, जून महिन्यात ती करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.
शासनाकडून गेल्या वर्षी या लागवडीचा कार्यक्रम आला होता; परंतु त्या मोहिमेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सचिव पातळीवरून याची दखल घेऊन कानउघाडणी झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात राजापूर, लांजा, संगमेश्वर, देवरूख, रत्नागिरी आदी ठिकाणी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. खड्डा मारून त्यामध्ये झाड लावणे आणि तीन वर्षे त्याची देखभाल करणे यासाठी एका खड्ड्याला साडेचार हजार रुपये याप्रमाणे जिल्ह्यात सुमारे साडेचार कोटींची दहा हजार झाडे लावण्यात येणार होती. राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी-पावस, देवरूख आदी ठिकाणी झाडे लावण्यात आली; परंतु भरउन्हामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे आणि वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे लागवड केलेल्यांपैकी ५० टक्क्यांवर झाडे करपली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या लागवडीला अनेकांनी विरोध केला होता. वाढता विरोध लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने उन्हाळ्यातील ही मोहीम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचे हे काम थांबले असून, पावसाळ्यात जून महिन्यात ही लागवड करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.
‘सकाळ’ बातमीचा परिणाम
गेले दोन दिवस राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरीत ऐन उन्हात सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेवर ‘सकाळ’ प्रकाश टाकत होते. ऐन उन्हामध्ये झाडे पाण्याविना करपून गेली आहेत. त्यामुळे मोहिमेचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. मोहीम थांबवावी, अशी अनेकांची मागणी होती. ‘सकाळ’ने हा विषय लावून धरल्याने बांधकाम विभागाने ऐन उन्हाळ्यात सुरू केलेली मोहीम थांबवली आहे.
कोट...
रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुक्यामध्ये ही वृक्ष लागवड सुरू होती. उन्हामध्ये झाडे करपत आहेत. त्यामुळे आम्ही ही मोहीम थांबवली आहे. जून महिन्यात पुन्हा वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली जाईल.
- अमोल ओठवणेकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.