‘डिकवलमधील मोबाईल
टॉवर कार्यान्वित करा’
मसुरे ः गोळवण-कुमामे-डिकवल ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातील डिकवलसाठी माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून दूरसंचारचा मोबाईल टॉवर मंजूर होऊन दोन वर्षांपूर्वी कामही पूर्ण झाले आहे; मात्र या टॉवरला सोलर सिस्टिम यंत्रणा बसवूनही अद्याप टॉवर सेवा कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोळवण तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय पाताडे यांनी सांगितले की, डिकवल दुर्गम भागात असून अनेक वर्षे सेवेपासून वंचित आहेत. टॉवरची सेवा कधी सुरू होईल, या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांनी दूरसंचारच्या सावंतवाडी कार्यालयाशी संपर्क साधला असता, वारंवार विविध कारणे सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोईप टॉवर येथून केबल टाकून डिकवल टॉवरपर्यंत कार्यान्वित केल्यावरच टॉवर सुरू होईल, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. हा टॉवर पंधरा दिवसांत सुरू न केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
-------
महिला कर्मचाऱ्यांचा
सावंतवाडीत सन्मान
सावंतवाडी ः महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. येथील श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केला. सावंतवाडी पालिकेतील महिला कर्मचारी नेहमी कर्तव्यदक्षपणे काम करतात. त्याबद्दल दीपाली आसोलकर यांनी या महिला कर्मचाऱ्यांचा फुलांची रोपे देऊन सन्मान केला. यावेळी कर विभागाच्या अधिकारी प्राची पाटील, परवीन शेख, माधवी म्हापसेकर, सपना नाईक, गीता जाधव, सुकन्या कुलकर्णी, लीना राणे, नेहा आडेलकर आदींचा गौरव करण्यात आला.
....................
घावनळेत १२ पासून
‘आमदार चषक’ स्पर्धा
कुडाळ ः आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश वारंग मित्रमंडळ व शिवसेना (शिंदे गट) घावनळे पुरस्कृत १२ ते १८ मार्च या कालावधीत घावनळे येथे वाढदिवस सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १२ ते १६ मार्च कालावधी घावनळे-खुटवळवाडी येथे ‘आमदार चषक-२०२५’ क्रिकेट स्पर्धा, १७ ला घावनळे ग्रामपंचायतीत रक्तदान शिबिर, १८ ला घावनळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, दुपारी ग्रामपंचायतीत हळदीकुंकू व मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले आहे.
.......................
सावंतवाडीत अखेर
पदपथाची दुरुस्ती
सावंतवाडी ः शहरातील तीन मुशीसमोरील मोती तलावाच्या काठाचा पदपथ खचून पादचाऱ्यांसाठी तो धोकादायक असल्याबाबत वृत्तपत्रांनी लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली. प्रशासनाने गुरुवारी (ता. ६) खचलेल्या या पदपथाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम उत्कृष्ट व्हावे, अशी मागणी होत आहे. खचलेला पदपथ कोसळून अपघाताची शक्यता पाहता वृत्तपत्रांनी प्रशासनाला जाग आणली होती. प्रशासनाने पदपथ दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.
.................
वेंगुर्लेत बुधवारी
वांद्रेश्वर उत्सव
वेंगुर्ले ः वेंगुर्ले-सुंदरभाटले येथील श्री देव वांद्रेश्वर देवस्थानचा वार्षिक उत्सव बुधवारी (ता. १२) साजरा होणार आहे. यानिमित्त श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद व रात्री ९ वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचा ‘श्री स्त्री विनायक’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.