‘जुन्या स्थानकमार्गे
बस पूर्ववत कराव्यात’
वेंगुर्ले ः जुन्या स्थानकमार्गे जाणाऱ्या सर्व बस पूर्वीप्रमाणे तत्काळ सुरू कराव्यात, अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेवक श्रेया मयेकर यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांना देण्यात आले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरात गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने जुन्या स्थानकमार्गे जाणाऱ्या बस बंद केल्या होत्या; परंतु आता काम संपूनही त्यामार्गे जाणाऱ्या बस सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. या सर्वांना एसटीसाठी दाभोली नाका किंवा शिरोडा नाका येथे पायी जावे लागत आहे. दाभोलीमार्गे येणाऱ्या बस जुन्या स्थानकावर उतरणारे प्रवासी असतानाही संबंधित गाड्या दाभोली नाक्यावरून सरळ नेल्या जात आहेत. हा प्रकार तत्काळ थांबवून एसटीतर्फे प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करू, असा इशाराही दिला. यावेळी माजी नगरसेवक श्रेया मयेकर, राजेश कांबळी, नागरिक शुभांगी मांजरेकर व छाया कोचरेकर आदी उपस्थित होते.
----
‘प्राथमिक शाळा
सकाळीच भरवा’
ओरोस ः कडक उन्हाळ्यामुळे जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषद शाळांची नियमित वेळ सकाळी १०.२० ते दुपारी ४.३० अशी आहे; मात्र यंदा उन्हाळ्याची तीव्रता मार्चपासूनच अधिक जाणवत असल्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच शाळेची वेळ सकाळच्या सत्रात होणे आवश्यक वाटत आहे. जिल्ह्यातील बहुतांश माध्यमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये भरविल्या जात आहेत; मात्र त्याच जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १०.२० ते ४.३० या वेळेत भरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा मार्चमध्ये सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी तातडीने आदेश व्हावेत, अशी विनंती केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी दिली.
...............
ठाकरे गटाचे गुरुवारी
सिंधुदुर्गनगरीत धरणे
मालवण ः गोळवण ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. गोळवण-कुमामे-डिकवलचे सरपंचांच्या भोंगळ कारभाराने संशयित परप्रांतीय व्यक्तीला रहिवासी प्रमाणपत्र दिल्याविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उपस्थित राहावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व गोळवण, कुमामे आणि डिकवल शाखेने केले आहे.
.................
कुडाळ येथे आज
आरोग्य तपासणी शिबिर
कुडाळ ः येथील (कै.) विजया वामन पाटणकर वाचनालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या (ता. ११) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वाचनालयात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून तपासणीदरम्यान लागणारी औषधे व गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. अधिकाधिक महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटणकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.