50390
‘कोर्ले सातंडी’ पाणीपुरवठ्यावरुन मतांतरे
देवगड नगरपंचायत सभा ः अटी शर्तीवर मान्यता देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः येथील देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ले सातंडी धरण प्रकल्पावरून संभाव्य नळपाणी पुरवठा योजनेच्या उद्भव विहिरींमध्येच परिसरातील सात गावांसाठीच्या योजनेचा पंप सोडण्याच्या विषयावर नगरसेवकांनी विविध सूचना मांडल्या. मागील अनुभवातून भविष्याचा विचार करून काही अटी शर्तींवर याला मान्यता देण्याचे यावेळी सुचवण्यात आले. दरम्यान, यातून देवगड जामसंडे शहराच्या पाणी आरक्षणावर काहीही परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
येथील नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात झाली. मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्यासह प्रणाली माने, शरद ठुकरूल आदी उपस्थित होते. सभेत देवगड जामसंडे शहराच्या पाण्याच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी भविष्यात कोर्ले सातंडी धरण प्रकल्पावरून नवीन योजना करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. योजनेच्या उद्भवाच्या ठिकाणच्या विहिरीमध्ये परिसरातील वाघिवरे, फणसगांव, पोंभुर्ले, विठ्ठलादेवी, उंडील, कुणकवण, बुरंबावडे आदी सात गावांसाठीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा पंप टाकण्याचा विषय प्रशासनाकडून मांडण्यात आला. यावर नगरसेवकांनी विविध मते मांडली. याच योजनेच्या विहिरीत अन्य योजनेचा पंप टाकल्यास भविष्यात शहराला पाणीपुरवठा होण्यामध्ये अडचणी येतील, अशी शंका उपस्थित करण्यात आली. यावर प्रशासनाने शहरासाठीचे पाणी आरक्षण अबाधित राहील तसेच ही स्वतंत्र नळयोजना असल्याने भविष्यात अडचणी येणार नाहीत, असे स्पष्ट केले. तरीही नगरसेवकांनी मागील योजनेच्या अनुभवावरून भविष्याचा विचार करून काही अटी शर्तींवर त्यासाठी मान्यता दर्शवावी, असे सुचविले. एकाच विहिरीवर दोन पंप असल्याने त्याचे विद्युतीकरण, विजबिल, देखभाल दुरुस्ती या अनुषंगाने विषय मांडण्यात आले. संबंधित सात गावासाठीच्या योजनेकरीता स्वतंत्र विद्युत रोहित्र बसवावे, असेही सुचवण्यात आले. भविष्यात या सात गावांमध्ये आणखी काही गावांची वाढ करायची झाल्यास किंवा योजनेमध्ये काही बदल करायचा झाल्यास पुन्हा नगरपंचायतीची परवानगी घेण्यात यावी, अशी अट असावी असेही सुचवण्यात आले. दहिबांव येथील योजनेच्या ठिकाणी नगरपंचायत गाळ उपसा करते, उन्हाळ्यात बंधारे बांधते. तरीही तेथील अन्य योजनांमुळे पाणी उपशामध्ये अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात या योजनेच्या बाबतीतही असे घडू नये, असे मत नगरसेवकांनी नोंदवले. शहरासाठीच्या कोर्ले सातंडी या धरण प्रकल्पावरून नळ पाणी पुरवठा योजनेच्या उपांगाचा अन्य योजनांसाठी वापर केला जाणार नाही, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. ही योजना स्वतंत्रपणे कार्यरत राहील तसेच पाणी आरक्षण अबाधित राहील, असेही त्यांनी सांगितले. तरीही सर्व अटी नोंदवल्याशिवाय मान्यता दिली जाऊ नये असे मत नगरसेवकांनी नोंदवले.
.................
‘त्या’ विषयांना अटी शर्तीवर मान्यता
नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वडांबा, तरवाडी, टिळकनगर, देवगड बाजारपेठ, साटमवाडी, मळई, जामसंडे टापू, भटवाडी या आठ अंगणवाडी दुरुस्ती व शांतीनगर येथे नवीन अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी ना हरकत देण्याच्या विषयावर काही अटी शर्तीवर मान्यता देण्याचे सुचवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.