swt२५२५.jpg
५३४४०
माड्याचीवाडी ः तांबाळ कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी अनिल पाटील. बाजूला गावडेकाका महाराज, तहसिलदार विरसिंग वसावे, रणजित देसाई, विघ्नेश गावडे, सुजय गावडे आदी.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन उपक्रमांची गरज
अनिल पाटीलःमाड्याचीवाडीत तांबाळ कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी तांबाळ कृषी पर्यटन केंद्र जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरावा असे हे नंदनवन रायवाडी माड्याचीवाडीत उभे राहिले आहे. पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी अशा अनेक उपक्रमांची सिंधुदुर्गला गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज तांबाळ कृषी पर्यटन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात केले. जुन्या मातीच्या घरांची ठेवण, २७ नक्षत्रवन, बैलजोडी, गोमातापूजन, आध्यमिक केंद्र आदी विविध वैशिष्ट्यांनी कोकणच्या संस्कृती या केंद्रात पहावयास मिळणार आहे. तालुक्यातील माड्याचीवाडी रायगाव येथे गावडे काका महाराज यांच्या तांबाळ कृषी पर्यटन केंद्राचे आज जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ते म्हणाले, "सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनाला अधिक चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तांबाळ कृषी पर्यटन केंद्राबरोबरच इतर अनेक उपक्रम होणे गरजेचे आहेत. ८३ गुंठे जागेत हा साकारलेला कृषी पर्यटन प्रकल्प आणि या प्रकल्पातून येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा मिळावी, नवनवीन काय साध्य करता येईल, या दृष्टिकोनातून युवा उद्योजक सुजय गावडे यांनी वाटचाल करावी."
तहसीलदार वसावे म्हणाले, "या कृषी पर्यटन केंद्रात विविध उपक्रमाबरोबरच कोकणची संस्कृती जपलेली आहे. विविध प्रकारचे वृक्ष, आरोग्यदायी वनस्पती या ठिकाणी लावल्या गेल्या आहेत. तांबाळ प्रकल्प हा अनुभवण्याचे ठिकाण आहे. आपल्या कोकणची संस्कृती येथेच आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी आला." श्री. देसाई यांनी ओसाड जंगलमयसारख्या जमिनीवर गावडे काका महाराज यांनी जे नंदनवन उभे केले, त्या जागेची प्रचिती आज या तांबाळ कृषी पर्यटनातून दिसून आलेली आहे. विशेष म्हणजे या पर्यटन केंद्रात आध्यात्मिक केंद्र सुद्धा आहे, असे सांगितले. सौ. कोरगावकर यांनी कोकणची संस्कृती भावी पिढीला समजावी, कोकणचे नंदनवन या तांबाळ प्रकल्पातून दिसून आल्याचे सांगत सुजय गावडेसारखे अजून नवीन उद्योजक या ठिकाणी तयार झाले पाहिजेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन निलेश पवार यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, कोकणचा मेवा देऊन सत्कार करण्यात आला. तांबाळ कृषी पर्यटन उद्घाटनाच्या निमित्ताने जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी निसर्गाच्या तसेच मालवणी कविता सादर केल्या. या तांबाळला अनुसरून कविता सादर करताना हे तांबड्या मातीचे आभाळ म्हणजे तांबाळ असून या ओसाड जागेला गावडेकाका महाराज यांनी नंदनवन करून ते अधिक कसे बहरेल यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. यावेळी गावडे काका महाराज, तहसीलदार वीरसिंग वसावे, रणजीत देसाई, अरुण म्हात्रे, श्वेता कोरगावकर, सरपंच माड्याचीवाडी विघ्नेश गावडे, दाजी गावकर, परशुराम गावडे, चंद्रशेखर परब, बंड्या सावंत, राजु राऊळ, दीपक सांडव, रूपाली सांडव, गणेशकाका घाडीगावकर, राकेश केसरकर, एकनाथ गावडे, सिद्धेश किनळेकर, आनंद सावंत, गुरु गावडे, सचिन गावडे, सोनाली गावडे, दाजी गोलम, सुजय गावडे, संदीप बिर्जे, संतोष परब, नितीन पिंगुळकर उपस्थित होते.
चौकट
दहा वर्षांच्या मेहनतीचे यश
गावडे काका महाराज म्हणाले, "तांबाळ प्रकल्प साकारताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. दहा वर्षानंतर खऱ्या अर्थाने केलेल्या मेहनतीचे चीज म्हणजे हा प्रकल्प आहे. आजच्या युवा पिढीने व्यवसायाकडे वाटचाल करताना जिद्द, चिकाटी, मेहनतीबरोबर आत्मविश्वास सोबत बाळगून वाटचाल केल्यास यश दूर नाही. कोकणात समृद्धी येण्यासाठी नवउद्योजक निर्माण झाले पाहिजेत. या ठिकाणी कोकणची संस्कृतीची आठवण करून देताना मातीच्या घरातील सुखद आनंद या ठिकाणी मिळतो. २७ नक्षत्रवन या ठिकाणी असून निसर्गाचे सौंदर्य अधिक कसे बहरेल, या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. कोकणची संस्कृती, बैलजोडी, गोमाता पूजन, नक्षत्रवन, जुन्या मातीच्या घराची ठेवण या ठिकाणी आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.