54432
जिल्ह्यात ८२१ ‘लाडक्या लेकी’
पाच हजारांचा लाभ ः ‘मुली सक्षमीकरण’अंतर्गत अनुदान
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः जिल्ह्यातील ८२१ लाडक्या लेकींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याच्या रुपात प्रत्येकी पाच हजारांचा लाभ या वर्षात देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
महाराष्ट्रात १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनामार्फत ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येते. दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ८२१ पात्र लाभार्थी मुलींना लेक लाडकी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात रुपये पाच हजारप्रमाणे एकूण ४१ लाख ०५ हजार रुपयांचा लाभ जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत अदा करण्यात आलेला आहे. लेक लाडकी योजना राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्युदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येते. या योजनेचा लाभ अधिकाधिक मुलींनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी केले आहे.
---
..अशी आहे योजना
‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत एकूण १ लाख १ हजार रुपये वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत मुलींच्या खात्यावर जमा केले जातात. जन्मानंतर पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा दिला जातो. मुलगी पहिली इयत्तेत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीमध्ये गेल्यावर ७ हजार रुपये, अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर उर्वरित ७५ हजारांचा शेवटचा हप्ता असे एकूण १ लाख १ हजार रुपये जमा केले जातात.
------
कोट
‘लेक लाडकी’ योजनेबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या अंगणवाडी सेविका व तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
- सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.