गृहोपयोगी संचाचे वाटप थांबवले
कामगार आयुक्तालय : एजंटांना चाप लावण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक व गृहोपयोगी संचाच्या वाटपामध्ये गोंधळ झाल्याने हे वाटप आजपासून तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले आहे. दिवसाला ८३५ जणांना याचे वाटप होणार होते. यासाठी मोठी गर्दी झाली. संच लवकर मिळण्यासाठी एजंटगिरी सुरू झाली. दोन हजार रुपये त्यासाठी घेतले जाऊ लागले. उन्हातान्हात लोक उभी राहू लागल्याने सुरक्षेच्यादृष्टीने आणि दलालीला चाप बसण्यासाठी हे वाटप थांबविण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. त्यानुसार कामगार आयुक्तालयाने हे वाटप थांबविले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जीवित नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच २४ एप्रिलपासून रत्नागिरी, चिपळूण व राजापूर तालुक्यामध्ये वाटप सुरू करण्यात आले होते. अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संच वाटप होत असताना प्रचंड गर्दी व गोंधळ होत आहे. कडक उन्हाळयाचे दिवस असल्याने कामगारांना या गर्दी गोंधळाचा त्रास होवू नये याबाबत योग्य ती खबरदारी व नियोजन करण्यात येवून तालुकानिहाय अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संच वाटप करण्याबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. तसेच गर्दीचा फायदा घेऊन काही एजंट तयार झाले होते. दोन हजार रुपये देऊन लवकर नंबर दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे या तक्रारी आल्या. त्याची त्यांनी तत्काळ दखल घेतली आणि कामगार आयुक्तांना याबाबत सुचित केले. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर हे वाटप करण्यात यावे, त्यामुळे असा गोंधळ होणार नाही. तसचे एजंटगिरी करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असेही आदेश त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.