62527
पावसापूर्वीची कामे तातडीने सुरू करा
वीज ग्राहक संघटनेची मागणीः कणकवली कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ः पावसाळ्यात होणाऱ्या विजेच्या समस्या लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी वीज ग्राहक संघटना कणकवली तालुका पदाधिकाऱ्यांसह व्यापारी महासंघ कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माळी यांच्याकडे केली.
यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ तथा दादा कुलकर्णी, कणकवली व्यापारी महासंघ तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, उपकार्यकारी अभियंता (वैभववाडी) कुमार चव्हाण, श्री. म्हेत्रे (मालवण), श्री. बगाडे (कणकवली), श्री. निमकर (देवगड) तथा आचरा विभाग प्रभारी आदी उपस्थित होते.
कोकणात पावसाळा सुरू झाला की विजेचा लपंडाव सुरू होतो. काही गावांमध्ये तर चार-चार दिवस विजेचा पत्ताच नसतो. कमकुवत असलेले इन्फ्रास्ट्रक्टर, महावितरणकडे कंत्राटदारांची खासगी यंत्रणा असूनही झाडे छाटणी योग्य पद्धतीने केली जात नाही. जंगलातून जाणारी लाईन साफसफाई न करणे, कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि अधिकाऱ्यांची मानसिकता यामुळे ग्राहकांना भरमसाठ बिले भरूनही अखंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. उलट वादळी पावसात झालेले नुकसान देखील वीज अधिभार आदींच्या स्वरुपात ग्राहकांच्याच माथी मारले जाते. त्याचबरोबर वीज ग्राहकांना दिली जाणारी अतिरिक्त सुरक्षा ठेव बिले, वारंवार खंडित होणारी वीज यामुळे व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान, प्रीपेड मीटर, वाढीव बिले असे अनेक विषय घेऊन कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता (कणकवली विभाग) श्री. माळी यांची भेट घेऊन वरील सर्व अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी केली. यावेळी चारही तालुक्यांतील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.
वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा योग्य विचार करून पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने करण्याची ग्वाही श्री. माळी यांनी दिली. यावेळी सुनील जाधव, उत्तम गावकर, संतोष नाईक, प्रकाश पावसकर, संजय वालावलकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.