65106
65107
अवैध मायनिंगविरोधात न्यायालयीन लढा उभारू
शिवसेना ठाकरे गट ः कासार्डेप्रश्नी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, प्रश्नांची सरबत्ती
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २० ः कासार्डे गावातील अनधिकृत सिलिका उत्खनन आणि सिलिकाची विनापरवाना वाहतूक या विरोधात ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासन काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कासार्डेतील अवैध मायनिंगविरोधात आता न्यायालयीन लढा उभारणार असल्याचेही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकरा वाजता माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशूराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, विधानसभा संघटक सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यात तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्यासह रूपेश आमडोसकर, राजू राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे शिवसेनेचा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेटवर अडविण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चर्चेसाठी प्रांताधिकाऱ्यांना बोलविले. मात्र, प्रांताधिकाऱ्यांनी तेथे येण्यास नकार देताच शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी वैभव नाईक यांनी कासार्डेतील अवैध मायनिंगबाबत तीन महिन्यांपूर्वी तक्रार करूनही तुम्ही त्यावर कारवाई का करत नाही? असा प्रश्न केला. तसेच परशूराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत यांनीही प्रश्नांचा भडिमार केला. श्री. कातकर यांनी कासार्डे परिसराला भेट दिली. त्यावेळी तेथे अवैध काहीही आढळले नाही, असा खुलासा केला. यावर सुशांत नाईक यांनी कणकवली तहसीलदारांनी गेल्या वर्षी कासार्डे परिसराला भेट दिल्यानंतर तेथे आढळलेला अवैध वाळू साठा, विना परवाना जागेत सुरू असलेले उत्खनन हा अहवाल खोटा आहे का? अशी विचारणा केली. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी यंदा सिलिका उत्खननासाठी नवे परवाने जारी केले आहेत त्याची माहिती दिली. मात्र, ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरूच ठेवला. तसेच प्रांताधिकारी आणि जिल्हा प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, यासाठी न्यायालयीन लढा देणार असल्याचे जाहीर केले.
पत्रकारांशी बोलताना माजी आमदार नाईक म्हणाले, ‘‘कासार्डे गावातील अवैध सिलिका उत्खनन, त्याची वाहतूक यामुळे येथील नदी, नाले प्रदूषित होत आहेत. अवैध मायनिंगमुळे दादागिरी वाढली आहे. याविरोधात आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे तीन महिन्यापूर्वी तक्रार दिली. मात्र, अद्याप काहीही कारवाई झाली नाही. उलट आम्ही तक्रार केली म्हणून आमच्याच क्रशरची तपासणी करण्यासाठी महसूल प्रशासनाने अधिकारी पाठवले.’’
कासार्डेतील अवैध सिलिका उत्खनन आणि वाहतूक यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी कासार्डे गावातील तलाठी, मंडल अधिकारी ही पदे रिक्त ठेवली आहेत. संपूर्ण कासार्डे परिसर मायनिंगवाल्यांसाठी मोकाट सोडला आहे, असे सतीश सावंत म्हणाले.
श्री. उपरकर यांनी, गुगल इमेजमध्ये पाहिल्यानंतर शासनाने दिलेली परवानगी आणि प्रत्यक्षात झालेले उत्खनन याचा अंदाज येऊ येतो. पण, कारवाई करायचीच नसल्याने महसूल प्रशासन गप्प आहे. आता आम्ही या विरोधात न्यायालयीन लढा देणार आहेत. गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी तक्रारी देऊन ही अवैध सिलिका उत्खननावर कारवाई होत नसेल तर अशा अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे सांगितले.
----------------
सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे अधिकारी ढिम्म
श्री. तेली म्हणाले, ‘‘शासनाकडून ४० हेक्टर क्षेत्रात उत्खनन करण्याची परवानगी घेण्यात आली. प्रत्यक्षात ८०० पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिलिका उत्खनन आणि त्याची वाहतूक केली जातेय. यात शासनाचा प्रचंड महसूल बुडतोय. मात्र, त्याची पर्वा प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना नाही. केवळ सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्यामुळे हे अधिकारी ढिम्म बसून असून अवैध सिलिका उत्खननावर कोणतीही कारवाई करत नाहीत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.