rat२३p३४.jpg-
65891
चिपळूणः मान्सूनपूर्व आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री उदय सामंत.
आपत्कालीन कायद्यान्वये वणवेप्रकरणी गुन्हे दाखल करा
पालकमंत्री सामंतः चार महिन्यानंतर आढावा अन् अधिकाऱ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : कोकणात वणवे नैसर्गिकरित्या लागतात की, जाणीवपूर्वक लावले जात आहेत, याची चौकशी करून आपत्कालीन कायदे लावून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथील पंचायत समितीमध्ये गुहागर व चिपळूण तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. त्यावेळी कोकणात लागणाऱ्या वणव्याचा प्रश्न चर्चेत आला.
चिपळूण व गुहागरमध्ये पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर दरडी कोसळण्याच्या ठिकाणांवर लक्ष ठेवा, लोकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत मान्सूनपूर्वक कामांचा आढावा घेण्यात आला. दरडी कोसळण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा होणार नाही, पाणी साचणार नाही, पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. खैर, बांबू लागवडींबाबतच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, चार महिन्यात चांगले काम करा. चार महिन्यानंतर आढावा घेतला जाईल आणि अधिकाऱ्यांचे काम पाहून त्यांचा सत्कार केला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
गेली पंधरा-वीस वर्षे वणव्यामध्ये मोठी हानी होत आहे. वृक्षतोड, भूस्खलन ही कारणे आहेतच; परंतु वणव्यामुळे अधिक वनसंपदा नष्ट होत आहे, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. बैठकीला आमदार भास्कर जाधव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गेपाटील, मुख्याधिकारी विशाल भोसले, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
प्रश्न शिष्टाचाराचा
जंगलातील वणवा आणि शिष्टाचार न पाळल्यामुळे संतापाचा वणवा यामुळे मान्सूनपूर्व आढावा बैठकीत वातावरण चांगलेच गरम झाले. आपत्कालीन विषयावरील महत्त्वाच्या बैठकीला आपल्याला निमंत्रण का नाही? मला बोलवू नका, असे पालकमंत्र्यांनी सांगितले का? असे विचारत आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महत्त्वाच्या बैठकांना त्या त्या भागातील स्थानिक आमदारांना बोलवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.