वेंगुर्लेत पावसाचा सर्वाधिक जोर
फळपिकांची मोठी हानी; मॉन्सूनपूर्वचे नियोजन कोलमडले
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ : पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. यामुळे कोकम, काजू, आंबा या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी घरदुरुस्ती रखडली असून पावसाळ्यात इंधन म्हणून वापरण्यासाठीची लाकडे भिजून गेली आहेत. जिल्ह्यात २१ ते २४ मे दरम्यान सरासरी ३१२.६२ मि.मी. पाऊस पडला असून सर्वाधिक पाऊस वेंगुर्ले तालुक्यात ३२८.९ मि.मी. पडला. यामुळे घरे व मांगर अशा ३१ मालमत्तांचे ९ लाख ३३ हजार ६७० रुपये एवढे नुकसान झाले आहे. कुडाळ येथे एकाचा वीज पडून तर नरडवे येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ जूननंतर दाखल होणारा मॉन्सून अजून दाखल झाला नसला तरी पूर्वमोसमी पाऊस २० मे पासून मुसळधार कोसळत आहे. १९ दिवस मॉन्सूनप्रमाणे दिमाखात दाखल झालेल्या पूर्वमोसमीने जिल्ह्यातील नागरिकांची दाणादाण उडविली आहे. अचानक आलेल्या या पावसाने जिल्हा प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पावसाच्या तोंडावर पावसाळ्यापूर्वीचे नियोजन व पूर्वतयारी करण्याची सवय लागलेल्या सर्वच शासकीय विभागांची गोची झाली आहे.
दरम्यान, कुडाळ येथील शिवाजी पार्क नजीक सिद्धिविनायक अपार्टमेंट बिल्डिंगचे काम करीत असलेल्या उत्तर प्रदेश येथील बुलट अन्सारी (वय २९) याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. २० मे रोजी सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथील एका घराचे ९ हजार ९५० रुपयांचे, सातार्डा येथील घराचे ३० हजार रुपये, डेगवे येथील घराचे ५० हजारांचे नुकसान झाले. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथील एका घरावर सुपारीचे झाड पडून १५ हजार रुपयांचे, कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे येथील एका घरावर झाड पडल्याने १० हजार, मालवण तालुक्यातील धामापूर येथे शेतमांगराचे ६० हजार, चिंदर येथे घराचे १० हजार रुपयांचे, नांदरुख येथे घराची पत्रे, कौले उडून दीड लाख, कणकवली तालुक्यात वायंगणी येथे संरक्षक भिंत कोसळून दोन लाखांचे नुकसान झाले. देवगड तालुक्यातील गिर्ये येथील घराच्या छपराचे १२ हजारांचे आणि ठाकूरवाडी येथील घराच्या छपराचे २५ हजारांचे नुकसान झाले. वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील घर व गोठा मिळून १३ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले. सर्वांचे मिळून २० रोजी ५ लाख ८५ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले.
२१ मे रोजी एकूण १० मालमत्तांचे दोन लाख ३२ हजार ९२० रुपयांचे नुकसान झाले आहे. यात दोडामार्ग तालुक्यात सासोली येथील घराचे २० हजार ४२० रुपये, सावंतवाडी तालुक्यात चौकुळ येथील घराचे १० हजार रुपयांचे, वेंगुर्ले तालुक्यात खवणे येथील घराचे ११ हजार रुपये आणि आरवलीतील घरावर झाड पडून २५ हजार, एका मांगराचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. कुडाळ शहरामधील घराचे १० हजार रुपयांचे, कणकवली तालुक्यात वागदे येथील भिंत कोसळून ७५ हजार नुकसान झाले. तसेच नरडवे येथील सिद्धी श्याम सावंत या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. देवगड तालुक्यातील जामसंडे तुळशीकाटे येथील एका घरावर झाड पडून २३ हजार ५०० रुपयांचे, वैभववाडी तालुक्यात आचिर्णे येथील घराचे १३ हजारांचे नुकसान झाले.
२२ मे रोजी दहा मालमत्तांचे एक लाख १५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. यात सावंतवाडी-इन्सुली येथील घराची कौले पडून १० हजार, सरमळे येथील गडगा कोसळून १० हजार, कुडाळ-पावशी येथील घराच्या पत्र्याचे १० हजार रुपयांचे तर पाट येथील घरावर झाड पडून १२ हजार ५०० रुपयांचे, मालवण तालुक्यात किर्लोस येथील घराची भिंत कोसळून २० हजार, त्रिंबक येथील घरावर झाड पडून २० हजार, मोगरणेत दरड कोसळून ३५ हजार, देऊळवाड्यात घरावर झाड पडून ५ हजार, चौकेत घरावर झाड पडून ८० हजार, आचरा हिर्लेवाडी येथील घरावर झाड पडून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
..............
जिल्ह्यात २१ ते २४ मे २५०१ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात २१ ते २४ मे दरम्यान २५०१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरी ३१२.६२ मि.मी. पाऊस पडला आहे. यात सर्वाधिक पाऊस २३ ला एकूण ७९६ मि.मी. पडला. या दिवशी सरासरी ९९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. आठ तालुक्यांत सर्वाधिक पाऊस वेंगुर्ले तालुक्यात ४९९.५ मि.मी. एवढा एकूण पडला, तर सर्वांत कमी पाऊस कुडाळ तालुक्यात २३२.८ मि.मी. पडला. या कालावधीत जिल्ह्यातील ३१ घरे आणि मांगर एवढ्या मालमत्तांचे नुकसान झाले. एकूण ९ लाख ३३ हजार ६७० रुपयांची हानी झाली.
---
दरडी, झाडे कोसळून वाहतूक ठप्प
पूर्वमोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात दरडी कोसळून रस्ते वाहतूक बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. २० मे रोजी करूळ घाटात, २१ रोजी सावंतवाडी तालुक्यात आंबोली घाटात, वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील खारेपाटण तिथवली भुईबावडा गगनबावडा रस्त्यावर, २३ रोजी करुळ घाटात पुन्हा दरड कोसळल्याने पुन्हा वाहतूक बंद झाली होती. याशिवाय कुडाळ आंबेडकर भवन येथे व देवगड तालुक्यात विजयदुर्ग तरळा रस्त्याव तसेच कुडाळ-चौके-धामापूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती. आता सर्व वाहतूक पूर्ववत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.