66136
66137
पेरणीच्या दिवसांत लावणीसारखा पाऊस
संततधारेमुळे बाजारपेठा ओस; व्यापारी, शेतकरी चिंताग्रस्त
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ः पारंपरिक पद्धतीने शेती करणारे तालुक्यातील शेतकरी मेच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरवात करायचे. तोपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचला असल्याचे सुतोवाच व्हायचे. पण यावेळी मान्सूनपूर्व पाऊस गेले १५ दिवस तालुक्यात पडत आहे. त्यामुळे आंबा, काजू, फणस आदी फळबागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
संपूर्ण मे महिनाभर धुमाकूळ घालणारा पाऊस पाहून सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन सुट्टीत गावाला आलेल्या चाकरमान्यांना सुट्टी संपण्यापूर्वीच माघारी फिरावे लागले. या पावसाने लग्न, सार्वजनिक पूजा, जयंती उत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले. या सगळ्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. मे महिन्यात रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ असायची. पण पावसामुळे बाजारपेठेत म्हणावी तशी ग्राहकांची वर्दळ दिसत नाही. परिणामी व्यापार मंदावला आहे. केवळ शेतीवर गुजराण असणाऱ्या बळीराजाची चिंता पावसाने वाढवली आहे. दरवर्षी मृग नक्षत्राची चाहूल लागताच सजग होणारा शेतकरी यावेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता गोंधळून गेला आहे. ऐन पेरणीच्या दिवसांत शेताच्या बांधावरून पावसाचे पाणी वहात आहे.
पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली तरच कोकणातील पेरणी सुलभ होऊ शकते. पेरणीनंतर नियमित पाऊस पडला तरच शेती बहरेल, अन्यथा कोकणातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल, हे वास्तव आहे.
कोट
आमच्या शेतात उन्हाळी हंगामात आम्ही कलिंगड, गोंडा, पालेभाजी आदी प्रकारची पिके घेतो. मेच्या मध्यापर्यंत हा हंगाम संपतो आणि मोकळ्या झालेल्या शेतात आम्ही भाजावळ करून भातशेतीची तयारी करतो. यावर्षी मात्र नऊ मे पासूनच पावसाला सुरवात झाल्याने आम्हाला पहिलेच पीक पूर्णपणे काढता आले नाही. शेतात भाजावळीची तयारी केली असताना तुफान पाऊस सुरू झाल्याने यावर्षी पेरणी करायची कशी? याचीच चिंता लागून राहिली आहे. सद्यस्थितीत शेतात पेरणी करणे शक्य नसून शेत जमीन पाण्याने भरलेली आहे. पावसाने विश्रांती घेऊन आठवडाभर चांगले ऊन पडल्यास यावर्षी पेरणी करणे शक्य होणार आहे.
- शुभम दोरकडे, प्रगतशील युवा शेतकरी, लोवले, संगमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.