swt298.jpg
66979
देवगडः तालुक्यात पावसामुळे भातशेती जमिनीत असे पाणी साचले आहे. (छायाचित्रः संतोष कुळकर्णी)
सिंधुदुर्गावासीयांची बेगमीची कामे रखडली
मॉन्सूनचे लवकर आगमनः खरीप हंगामही खडतर जाण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ः सुरूवातीला पूर्वमोसमी पावसाने झोडपले आणि आता लगेचच मॉन्सूनचे आगमन झाल्याने जिल्हावासीयांची पावसाळी बेगमीची कामे रखडली आहेत. मसाला तयार करणे, आमसोलं तयार करण्याच्या कामांमध्ये अडथळा आला आहे. शेतीपीकाचीही पावसाने नुकसानी झाली. त्यामुळे यंदा पाऊस वेळेआधी आल्याने एकीकडे सुखावह बाब ठरली असली तरीही दुसरीकडे खरीप हंगामाची सुरूवात मात्र काहीशी खडतर ठरण्याची शक्यता आहे.
उन्हाळी हंगामात पावसाळी बेगमीची कामे चालतात. साधारणपणे ग्रामीण भागात याची अधिक तयारी असते. उन्हाळ्यात आंबा व्यवसाय उरकत आला की शेतकरी भातशेतीच्या कामाला लागतो. त्यासाठी आवश्यक असणारी जमिन मशागत केली जाते. मॉन्सूनपूर्व बरसणाऱ्या हलक्या सरीमुळे जमिन ओलसर झाल्यावर नांगरणी करून भात बियाणे पेरणी केली जाते. याचबरोबरच दुसरीकडे रतांबे काढून त्यापासून आमसोलं, आगळ बनवण्याचे काम चालते. त्यासाठी कडक ऊन्हाची आवश्यकता भासते. आमसोलं तयार करताना किमान आठ दिवस तरी कडक ऊनाची गरज भासते. मात्र, यंदा मॉन्सूनपूर्व पावसाचे वेळआधी आणि दमदार आगमन झाल्याने अनेकांचे रतांबे झाडावरच राहिले. त्याची काढणी केली तरी त्यापासून उत्पादन घेण्यासाठी पुरेसे ऊन नसल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. तसेच ग्रामीण भागात पावसाळी हंगामासाठी मसाला तयार केला जातो. ही कामेही पावसापूर्वी उन्हाळ्यात चालतात. उन्हाळ्यात मिरची खरेदी करून वाळवली जाते. त्यानंतर मिरचीपासून मसाला बनवला जातो. मात्र, यंदा पावसामुळे अनेक कुटुंबाना मसाला बनवताना अडचणी जाणवल्या. आंबा हंगाम संपल्यावर सर्वसाहित्य जागेवर ठेवून नंतर पावसाळी बेगमीची कामे हाती घेतली जातात. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पाऊसच दमदार आणि बरेच दिवस पडत राहिल्याने सर्वसामान्यांचे पावसाळी गणित कोलमडले आहे. पूर्वमोसमी पाऊस दमदार झाल्याने अनेकांना मॉन्सूनचे स्वागत करण्याची संधी मिळाली नाही.
चौकट
कोकमची उत्पादने महागणार
यंदा पावसाने रतांबा काढणी पूर्ण क्षमतेने करता आली नाही. तसेच काढलेले रतांबे वाळवण्यासाठी संधी उपलब्ध झाली नसल्याने रतांबापासून बनवले जाणारी आमसोलं, आगळ तसेच कोकम सरबते आदी प्रक्रीया उत्पादने पुरेशा प्रमाणात घेता आलेली नाही. पर्यायाने ही उत्पादने महागण्याची शक्यता आहे. कोकम घराघरात वापरले जात असल्याने त्याच्या अल्प उत्पादनामुळे त्याच्या वाढत्या किंमतीची सर्वसामान्य कुटुंबाला झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट
मिरगाचा बाजाराचे स्वप्नच
उन्हाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध लागतात. तत्पूर्वी ग्रामीण भागात मिरगाचा (मृग नक्षत्राचा) बाजार भरतो. यामध्ये पावसाळ्यात लागणारी सुकी मासळी, शेतीजन्य साहित्य, भात नांगरणीसाठी लागणारे साहित्य असते. तसेच कडधान्य, तांदुळ, कुळीथपीठ यासह अन्य पावसाळ्यात लागणारे साहित्य खरेदी केले जाते. मात्र, यंदा मिरगाचा बाजार भरण्याची संधी पावसाने काही दिली नाही. शेतकरीही आता बियाणी खरेदी करून पेरणीच्या नियोजनात आहेत.
चौकट
भाजीपाल्यावर परिणाम
पावसाला आधीच सुरूवात झाल्याने ग्रामीण भागातून भाजीपाला बियाण्यांना मागणी वाढली आहे. मे महिन्यामध्येच भाजी पेरणी झाल्यास लवकर भाजीपाला बाजारात येईल आणि ऐन गणेशोत्सवाच्या काळात गावठी भाज्यांचा तुटवडा भासेल, अशीही शक्यता आहे. सध्या बाजारात पालेभाज्या, भेंडे विक्रीस येताना दिसत आहेत. मध्यंतरी झालेल्या पावसावेळी पेरलेले बियाण्यांपासून बाजारात आता भाजी येत आहे. यंदा पाऊस लवकर आल्याने भाज्यांचे नियोजनही बिघडू शकते अशी स्थिती आहे.
चौकट
सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले
अवकाळी पावसानंतर पुन्हा कडाक्याचे ऊन पडेल आणि आपली उर्वरित कामे करता येतील, अशी सर्वसामान्यांना आशा होती. मात्र, पूर्वमोसमी पावसाला जोडूनच मॉन्सुनचे दमदार आगमन झाल्याने आता संधी हुकल्याचे शल्य आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने सर्वसामान्यांना पावसाळी बेगमीची कामे करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या नियोजनाची पावसाने निराशा केली. उन्हाळ्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जुनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येण्याचा सर्वसाधारण ठोकताळा असतो. अशावेळी ग्रामीण भागात गुरांना आवश्यक असणारे गवत भरणे, जळावू लाकडे सुरक्षित ठिकाणी ठेवणे, आवश्यक लाकडे फोडून घेणे, घरे-गोठे यांची डागडुजी करणे यासह अन्य शेतीची कामे चालतात. मात्र, पावसाने यालाही संधी मिळालेली नाही. पर्यायाने सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.