67260
व्यावसायिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न
पालकमंत्री राणे ः सिंधुदुर्गनगरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः शिक्षण क्षेत्रातून जिल्ह्याचा विकास होवू शकतो, ही गरज ओळखून खासदार नारायण राणे यांनी सर्वच शिक्षण सुविधा जिल्ह्यात उभ्या केल्या आहेत. आज आपला जिल्हा दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालात राज्यात प्रथम येत आहे. १०० टक्के गुण येथील विद्यार्थी प्राप्त करत आहेत. या यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना व्यवसायांच्या माध्यमातून नोकऱ्या देणारे बनविण्यासाठी आवश्यक सुविधायुक्त वातावरण जिल्ह्यात निर्माण करू, असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी केले.
पालकमंत्री राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, अपर पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, शिक्षणाधिकारी कविता शिंपी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील बारावीच्या विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा व दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री राणे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि लॅपटॉप देऊन केला.
ते म्हणाले, ‘‘मोठमोठ्या शहरांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांगीण शिक्षणाची द्वारे उघडली गेली पाहिजेत. यासाठी खासदार राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध केल्या. सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. शिक्षणात सिंधुदुर्ग जिल्हा कमी पडू नये यासाठी माझाही प्रयत्न सुरू असून त्यासाठी लागणारे प्रयत्न निश्चितच करणार आहोत. जिल्ह्यातील दहावी, बारावीचा निकाल पाहून मनापासून आनंद वाटतो. यात सातत्य राखतानाच मोठ्या प्रमाणात यश मिळविलेल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना विविध व्यवसायात उतरून रोजगार निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण, सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’
------------
सत्कारमूर्ती विद्यार्थी
मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमधील आर्या राणे आणि श्रेयश बर्वे, कुडाळ हायस्कूलमधील चैतन्या सावंत या तीन विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये १०० टक्के गुण मिळवून प्रथम, स्मितेश कडुलकर, रेश्मा पालव, विधी चिंदरकर, ध्रुव तेंडुलकर, हर्षदा हडलगेकर या पाच विद्यार्थ्यांनी ९९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर नक्षत्रा काळे या विद्यार्थिनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वांचा तसेच बारावीमधील विज्ञान शाखेतील अथर्व जाधव, मधुकर तेंडुलकर, काशीराम पालव, कला शाखेतील तनिषा दळवी, प्रियंका कोकरे, मानसी मांजरेकर तर वाणिज्य शाखेतील आयुषी भोगटे, चित्राली वाळुंजे, तनुज परब या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले आहेत. त्यांचा लॅपटॉप देऊन सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.