67357
माजी सैनिकांसाठी सर्वतोपरी प्रयत्न
नीतेश राणे ः सावंतवाडीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी सीएसडी (कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट) केंद्रीय सुविधा पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
दरम्यान, सिंधुदुर्गात तब्बल पाच हजार माजी सैनिक व बारा हजार सैनिक कुटुंबीय आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज केंद्र व राज्य सरकार हे एकाच विचारांचे आहे. खासदार नारायण राणेंसह आम्ही देखील सत्तेत आहोत. त्यामुळे लवकरच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी विश्रामगृहावर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गावडे आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सरचिटणीस महेश सारंग आदी उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेकडून बाबूराव कविटकर, शशिकांत गावडे, सुभाष सावंत, दीनानाथ सावंत, दीपक राऊळ, कृष्णा परब, भिवा गावडे, सुनील राऊळ, प्रकाश सावंत, अनंत सावंत, विश्वजित सावंत, सगुण पास्ते, मोहन राऊळ, आप्पा राऊळ, संतोष सावंत, सहदेव राऊळ, दीपक राऊळ, सुधाकर नाईक, प्रल्हाद तावडे उपस्थित होते.
यावेळी शशिकांत गावडे यांनी जिल्ह्यातील सीएसडी कॅन्टीनच्या समस्येकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टी. ए. बटालियन, कोल्हापूर यांची सीएसडी कॅन्टीन सुरू होती; परंतु काही कारणास्तव १४ फेब्रुवारी २०१९ ला टी. ए. बटालियनचे युनिट हलवल्यामुळे सावंतवाडी येथील कॅन्टीन कोल्हापूर येथे नेले. यामुळे गेली आठ वर्षे कॅन्टीन सुविधा नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५ ते ६ हजार कॅन्टीन कार्डधारक माजी सैनिक या सुविधेपासून वंचित आहेत. या माजी सैनिकांना कॅन्टीनसाठी बेळगाव, कोल्हापूर, कर्नाटक, गोवा तसेच इतर राज्यांमध्ये जावे लागत आहे. कॅन्टीन सुविधा पूर्ववत सुरू करण्यासाठी जी.के.सी. सब एरिया, पुणे तसेच टी.ए. बटालियन कॅन्टीन, कोल्हापूर यांच्याशी संघटनेद्वारे वेळोवेळी पत्रव्यवहार केला; परंतु अद्यापपर्यंत सुविधा दिली नाही, असे गावडे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री राणे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक यांच्याबद्दल अभिमान वाटतो. त्यांचे प्रश्न सोडविणे कर्तव्य आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रश्न नेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष प्रश्न म्हणून दिल्ली दरबारीही हा प्रश्न मांडेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, मागण्यांवर सकारात्मक विचार करून माजी सैनिकांच्या या मूलभूत गरजेकडे जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही पालकमंत्री राणे यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील हजारो माजी सैनिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
-----
संघटनेच्या काही मागण्या
ओरोस येथे कॅन्टीनसाठी २ हजार स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असून, ती जागा उपलब्ध करावी. सीएसडी कॅन्टीन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यासाठी खासदार राणे यांच्यामार्फत संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी घ्यावी. कॅन्टीनसाठी सैन्य दलाकडून २ कोटी रुपये गुंतवण्याची अट सांगितली जाते, ती शिथिल करून शासनाच्या फंडातून रक्कम उभी करून सुविधा देण्यास सहकार्य करावे आदी मागण्या संघटनेने पालकमंत्र्यांकडे केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.