संतांचे संगती--------लोगो
(५ जून १०२)
आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेमध्ये तीन प्रकारच्या ग्रंथांचा उल्लेख येतो. श्रुती म्हणजे वेद वाङ्मय स्मृती म्हणजे आचारणाबद्दल मार्गदर्शन करणारे ग्रंथ आणि पुराण ग्रंथ. या पुराणांमध्ये गोष्टीरूपाने ज्ञान दिले जाते. पुरा नवं भवति अर्थात् जे जुने असूनही आजच्या काळात उपयोगी पडते त्या ज्ञानाला पुराण असे म्हणतात. श्री देवी भागवत या पुराणातील दशम स्कंधामध्ये सत्यवान सावित्री आख्यान आले आहे. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वटसावित्री व्रत केले जाते म्हणूनच ही कथा विशेषतः यम सावित्री संवाद काय शिकवतो ते पाहूया.
- rat११p६.jpg-
25N69825
- धनंजय चितळे, चिपळूण
----
यम सावित्री संवाद.....११ निषिद्ध कर्मे
अश्वपती नावाच्या राजाने सावित्रीची उपासना केली व तिच्या आशीर्वादाने त्याला रूपसंपन्न आणि गुणसंपन्न कन्या प्राप्त झाली. मोठ्या काळजीने मातापित्यांनी या कन्येला मोठी केली. जेव्हा ती विवाहयोग्य वयाची झाली तेव्हा राजाने तिच्या योग्यतेचा वर शोधण्याचा खूप प्रयत्न केला; पण व्यर्थ. अखेर त्याने सावित्रीलाच तूच तुझ्यासाठी योग्य असा पती निवड. तुझी निवड आम्हाला मान्य असेल, असे सांगितले. त्याप्रमाणे सावित्रीने मुळात राजपुत्र असणाऱ्या; पण सध्या राज्य गमावलेल्या सर्वगुणसंपन्न सत्यवानाला पती म्हणून निवडले. देवर्षी नारदांनी सावित्रीला सत्यवान अल्पायुषी आहे याची कल्पना दिली होती; पण तरीही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. नारदमुनींनी सांगितलेल्या दिवशी सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यमराज स्वतः आले. या वेळी सावित्री त्यांच्याबरोबर चालत निघाली, यमराजाने तिला परत फिरण्याची आज्ञा केली; पण ती म्हणाली, ‘कोणत्या का कारणाने होईना मला आपल्या संगतीचा लाभ मिळाला आहे. तो मी सोडणार नाही. माझ्या मनात काही शंका आहेत, त्यांचे मी आता निरसन करून घेणार आहे.’ यानंतर यमधर्म आणि सावित्री यांचा संवाद सुरू झाला. जेव्हा एखाद्याला जिज्ञासा असते तेव्हा तो नम्रभावाने शंका विचारतो आणि ज्ञानी माणूस योग्य शब्दात शंकानिरसन करतो. समर्पक उदाहरणे देऊन मुद्दा स्पष्ट करतो तेव्हा त्या दोघांमध्ये संवाद घडतो. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी यांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे,
जनी वादवेवाद सोडोनि द्यावा। जनी सुखसंवाद सुखे करावा।
जगी तोचि तो शोकसंतापहारी। तुटे वाद संवाद तो हितकारी।।
या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणेच यमसावित्री संवाद हा सुखसंवाद आहे. ज्याप्रमाणे यम आणि नचिकेत यांच्या संवादातून कठोपनिषद सिद्ध झाले त्या प्रकारचाच हा आताचा संवादही अत्यंत प्रासादिक आहे. आपल्याकडे जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून हे व्रत आहे, ही चुकीची समजूत आहे. आम्ही एका अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित असणाऱ्या या कथाभागाचा विनोदासाठी वापर करतो. आपल्याच धर्माची टिंगल करून आपण काय साध्य करतो? वाचकहो, हा कथाभाग इतका अर्थपूर्ण आहे की, योगी अरविंद यांनी सावित्री या विषयावर २० हजारांहून अधिक ओळींचे महाकाव्य लिहिले आहे.
आपण या संवादातील महत्त्वाची प्रश्नोत्तरे समजून घेऊया.
महाभारताच्या वनपरवामध्ये मार्कंडेय ऋषी व धर्मराज युधिष्ठिर यांच्यातील संवाद आला आहे. या संवादात मार्कंडेय ऋषींनी सहा अध्यायात सत्यवान सावित्री कथा सांगितली आहे. याचप्रमाणे स्कंदपुराणांमध्ये सनत् कुमार व भगवान शंकर यांच्यातील संवादात ही कथा आली आहे तसेच ब्रह्मवैवर्त पुराणातही सत्यवान सावित्री आख्यान सांगितले आहे. आत्ता आपण जे आख्यान पाहत आहोत ते श्रीदेवी भागवतातील नवव्या स्कंधातील अध्याय २६ ते ३८ मध्ये आलेले आख्यान आहे. या संवादाच्या प्रारंभी सावित्रीने विचारले कर्म म्हणजे काय, कर्म कोणती आहेत, देह किती आहेत, देहातील चैतन्य म्हणजे कोण, जीव कोणाला म्हणतात आणि परमात्मा कोणाला म्हटले जाते? यमधर्माने या सर्वांची सविस्तर उत्तरे सावित्रीला दिली. यमराज सांगतात, जे कर्म शास्त्र मान्य असून, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाते ते कर्म उत्तम फळ देते यालाच शुभ कर्म असे म्हणतात; पण जे कर्मशास्त्रविरुद्ध असते ते केले असता वाईट फळ मिळते म्हणून याला अधंमकर्म असे म्हणतात. देहाच्या आधारे जीव हे कर्म करतो म्हणूनच जिवाला देही असे म्हटले जाते. देहामध्ये असणारे मन हेच कर्माचे प्रेरक आहे. इतके झाल्यानंतर ते पुन्हा एकदा सावित्रीला परत जाण्याची आज्ञा करतात. त्याही वेळेला सावित्री सांगते की, आपली संगत माझी ज्ञानलालसा पूर्ण करत आहे म्हणून आपल्यासारख्या ज्ञानसागराला मी सोडून जाऊ इच्छित नाही. वाचकहो, यम ही केवळ मृत्यूची देवता नाही तर ती धर्माचीही देवता आहे म्हणून कोणीतरी निरपेक्ष भावनेने ज्ञानग्रहण करत आहे, हे पाहिल्यावर यमदेवांना अत्यंत बरे वाटले आणि त्यांनी पुढील प्रश्न विचारण्याची आज्ञा केली. या संवादामध्ये भगवंतांची भक्ती कशी करावी, दान म्हणजे काय, उपासनेचे विविध मार्ग कोणते, इत्यादी अनेक गोष्टींची चर्चा झाल्याचे दिसते. या चर्चेच्या ओघात सावित्रीने कोणती करणे त्याज्य असून, ती केली असता माणसाला नरकामध्ये शासन केले जाते, असे विचारले त्यावर यमदरमानी विविध त्याज्य कर्मे सांगितली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे,
१) बोलताना कटू वचन वापरणे
२) उपाशी माणसाला अन्न न देणे
३) समोर कोणी बसलेले असताना त्यांना न देता त्यांच्यासमोर एकट्याने खाणे
४) देव सद्ग्रंथ यांना नावे ठेवणे, त्यांची निंदा करणे, यमधर्माच्या सांगण्याप्रमाणे या पापाला कोणतेही प्रायश्चित्त नाही.
५) माता-पिता, गुरू, पत्नी, पुत्र आणि आपल्यावर अवलंबून असणारे सर्व यांचे भरण पोषण न करणे
६) अतिथी आलेला पाहून तोंड वाकडे करणे
७) एखाद्या व्यक्तीची तिच्यातील व्यंगावरून टिंगल करणे
८) आपल्या कन्येचे आपल्या स्वार्थासाठी प्रसंगी पैसे घेऊन अयोग्य वराशी लग्न लावणे
९) फक्त मूर्तीतच देवांना पाहणे
१०) नद्यांमध्ये घाण करणे तसेच प्राण्यांना चरता येईल अशा जमिनीवरती अतिक्रमण करणे
११) ज्याला खरी ज्ञानलालसा आहे त्याला ज्ञान न देणे
वाचकहो, ही ११ निषिद्ध कर्मे वाचली तरी ही कर्मे आजच्या काळातही त्याज्यच आहेत, हे ध्यानी येते. म्हणूनच कोणतेही व्रत नुसते करून टाकण्यापेक्षा त्याचा डोळसपणे विचार करून त्याप्रमाणे वागणे महत्त्वाचे ठरते.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.