कोकण

विध्वंस पाऊस नव्हे माणूस घडवतोय

CD

बीग स्टोरी
KOP२५N७०७४३


इंट्रो

वातावरणातील बदलाचा सर्वात मोठा परिणाम कोकणात जाणवतो तो पावसाळ्यात. त्याची झलक मे महिन्यात आणि गेल्या २ दिवसात जिल्ह्यात अनुभवायला आली. नदीनाल्यांना अकल्पित पूर, कुठे झाडे पडतात, कुठे पुराचे पाणी लोकवस्तीत घुसले, रस्ते खचले, डांबर वाहून गेले. या सर्व आपत्ती केवळ पावसामुळेच आलेल्या नाहीत. तर त्याला माणसांची हाव, ठेकेदार अन् सत्ताधारी यांची एकमेकांचे हितसंबंध सांभाळणारी युती, निसर्गात अक्षम्य हस्तक्षेप कारणीभूत आहेत. गुहागर, दापोली राजापूर चिपळूण आडिवरे पावस नरवण येथील तपशील वेगवेगळा असला तरी पाणी घुसून नुकसान होण्याची कारणे समान आहेत. हा विध्वंस निसर्गाने केलेला नाही तर माणसानेच केला. अशा चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामाना आपत्ती आल्यावर नव्हे तर ती सुरू झाल्यावर विरोध करायला हवा.
- मयुरेश पाटणकर, गुहागर
------

विध्वंस पाऊस नव्हे माणूस घडवतोय
बांधकामांनी विकास नव्हे भकास जिल्हा; सामान्यांना वाली कोण?

-------

नरवण बाजारपेठेत महापूर

गुहागर तालुक्यातील नरवणमध्ये १२ जूनला मुसळधार पावसामुळे अकस्मात पूर आला. डोंगरातील ५०० हून अधिक वर्ष जुने व्याघ्रांबरी मंदिर, बाजारपेठेमागील लक्ष्मी केशव मंदिरात पाणी शिरले. बाजारपेठ परिसरात दोन फुट पाणी आणि चिखल होता. दोन घरात चिखल पाणी घुसले. रस्त्यावर माती, दगड, धोंडे इतके होते की चालणेही अवघड बनले होते. १३ जूनला वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी तब्बल १० तास काम सुरू होते. नरवण गावावर कोसळलेलीआपत्ती नैसर्गिक नव्हे तर मानव निर्मित असल्याचे समोर आले. रस्त्याच्या बाजूला खणलेले चर, नदीतील गाळ वर्षानुवर्षे उपसलेला नाही आणि डोंगरमाथ्यावरील रस्ता करताना घातलेल्या मोऱ्या या तीन बाबी नरवणच्या पुराला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समोर आला.

------

ठेकेदाराचा बेजबाबदारपणा

नरवण गावात शिरणाऱ्या १ किमी लांबीच्या तीव्र उताराच्या रस्त्यालगत दोन्ही बाजूची गटारे खणून त्यामध्ये इंटरनेट सेवेसाठीची वाहिनी आणि महावितरणची वीजवाहिनी टाकण्यात आली. मात्र काम झाल्यावर ठेकेदारांनी दोन्ही बाजूचे चर बुजवून, त्यावर गटार बांधले नाही. ग्रामपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकामाने सांगून देखील ठेकेदाराने दुर्लक्ष केले. परिणामी दोन तासात पडलेल्या पावसाने खोदलेल्या चरातील माती, दगडधोंडे वाहून रस्त्यावर आले, वेगवान प्रवाहामुळे बाजारपेठेत, लोकांच्या घरात हा मलबा शिरला. नरवणमधील तीव्र उताराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४ ते ६ फुटाचे चर पडले आहेत. रस्त्याखालील माती अनेक ठिकाणी वाहून गेली आहे. त्यामुळे आता सागरी महामार्गाला धोका निर्माण झाला आहे. ही स्थिती केवळ नरवणमध्येच नाही तर नरवणच्या पुढे असलेल्या रोहीले, तवसाळ गावातही अशीच परिस्थिती आहे. तवसाळकडे जाणाऱ्या रस्ता तर ठेकेदाराने समुद्राच्या बाजूने खणल्याने तेथील रस्ताच खचणार आहे. आता हा रस्ता दुरुस्त करताना काही किमीची संरक्षक भिंत बांधण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर येणार आहे.
------
70718

नरवणच्या नदीतील गाळ तसाच

नरवण बाजारपेठतून जाणारी नदी आणि आजूबाजूची शेती यामध्ये केवळ २ फुटाचे अंतर आहे. या नदीतील गाळ काढण्यासाठी प्रवीण वेल्हाळ सरपंच असताना त्यांनी कृषी विभागामार्फत शासनाकडे पाठपुरावाही केला. नरवण ग्रामपंचायतीकडे पाणलोट विभागात ८० लाखांचा निधी शिल्लक होता. या निधीतून गाळ काढावा असा प्रस्तावही पाठविण्यात आला. मात्र गाळ काढण्यासाठी स्वतंत्र निधी देतो पाणलोटचा निधी या कामासाठी वापरू नये असा शेरा आला. शासनाकडून गेल्या तीन वर्षात निधीच आला नाही. पुराला गाळही कारणीभूत ठरलाआहे.
------

माळरानावरील रस्त्याचा परिणाम

हेदवीकडून नरवणला जाताना एक कातळाचे पठार आहे. डोंगरमाथ्यावरील या परिसरातून मुसलोंडी, वाघांबे या गावांकडे जाणारा रस्ता आहे. गेली दोन वर्ष या रस्त्यांची उंची व रुंदी वाढवून खडीकरण, डांबरीकरणाचे काम सुरू होते. हे काम करताना काही ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या. रस्ता होण्यापूर्वी माळरानावरील पावसाचे पाणी चहूबाजूच्या उताराने वेगवेगळ्या भागातील नाल्यांना मिळायचे. परंतु रस्त्याची उंची वाढल्याने माळरानावरील पाणी साचले आणि रस्त्यावर बांधलेल्या मोऱ्यांमधून एकाच दिशेने प्रवाहित झाले. हे पाणी पुढे नरवणमध्ये येणाऱ्या नदीला मिळाले. परिणामी यावेळी नदीतून वाहणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात हे पाणी मिसळले.
---------
70741

असगोलीत पूर, गुहागरात गटारे तुंबली

१४ जूनला झालेल्या पावसामुळे असगोलीतील नाल्याला मोठा पूर आला. या पुरामुळे असगोलीच्या मधल्यावाडीतील लोखंडी साकव तुटला. खारवीवाडीतील मोठ्या पुलावरील डांबर उखडले. खारवीवाडीत पुलाचे पाणी घुसले. याच पावसामुळे गुहागरमधील गटार सदृश नाला तुंबला आणि पाणी साचले.या दोन्ही घटनांमध्ये पावसाळ्यापूर्वी माणसांनी टाकलेला कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा झाला नसल्याचे समोर आले. पावसाळ्यानंतरचे सहा महिने कोरडे पडलेले नाले आणि गटारे म्हणजे इमारतीच्या राड्यारोड्यापासून ते घरातील नको असलेले सामान टाकणाऱ्या कचराकुंड्याच असतात. पावसाळ्यापूर्वी यांची सफाई करण्याचे काम स्थानिक प्रशासनाने करावे अशी अपेक्षा असते. या मानसिकतेत गुहागर पंचायत समिती कार्यालयही असते. हा कचरा वाहून जाताना मोऱ्यांवर अडतो आणि पाणी तुंबते.
------
N70716

महामार्गांची होते नदी

मुंबई -गोवा महामार्ग असो की, गुहागर विजापूर महामार्ग या सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यावरून पावसाळ्यात वेगाने पाणी वहाते. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. वास्तविक महामार्गाचे आरेखन करताना रस्त्याचा उतार, आजूबाजूचे उतार, पाण्याचे प्रवाह यांची सांगड घालणे विज्ञान तंत्रज्ञानामुळे सहज शक्य आहे. एकतर तसे आरेखन केले जात नाही किंवा ठेकेदार आरेखनाप्रमाणे रस्ते बांधत नाही. त्यापुढे जाऊन या चुका दुरुस्तही केल्या जात नाहीत. त्यांची चिंता ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना असते ना ठेकेदाराला असते. या चुकांचा परिणाम वाहनचालकांना आणि महामार्गाशेजारील दुकाने आणि घरांना भोगावा लागतो. संगमेश्वर ते देवरुख दरम्यान खासगी कंपनीने केबल टाकण्यासाठी रस्त्याची साइड पट्टी आणि गटारात केलेल्या खोदकामामुळे पावसात रस्ता खचला असून अनेक ठिकाणी गटारे बुजल्याने पाणी तुंबून पाणी रस्त्यावरून वाहण्याचे प्रकार घडत आहेत. साइड पट्टीवरून पादचाऱ्यांना चालणे देखील मुश्कील झाले आहे. खासगी कंपनीने केबल टाकून झाल्यानंतर साइड पट्टीवर रोलर न फिरवल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरील गाईड स्टोन उखडून टाकल्याने रात्रीच्या वेळी रस्त्याची बाजू समजणे देखील कठीण झाले आहे. मुसळधार पावसात अनेक ठिकाणी संगमेश्वर-देवरुख मार्गावर पावसाचे पाणी साठत आहे.
----------

भौगोलिक रचनेचा विचार न करता कामे

नरवण हे तीन बाजूने डोंगरानी वेढलेले आहे. त्याच्या एका बाजूला समुद्र आहे. डोंगरावर कातळभाग आहे. कातळ म्हणजे laterite जो पोरस असतो (छिद्र असलेला). हा कातळभाग अनेक वर्षांपासून तसाच आहे. तो पावसाचे पाणी छोट्या छोट्या डबक्यात आणि उथळ भागात साठवतो आणि हळू हळू खाली सोडतो. एवढ्या वर्षात कोणीही याला हात लावण्याचा प्रयत्न केलेला नाही. या कातळभागाला समांतर उतार असल्यामुळे हे पाणी सर्व उतारामधून खाली यायचे. कुठे एक ठिकाणी याचा फोर्स जास्ती नसायचा. काही पाणी हेदवी, केळपाटकडे तर काही पाणी मुसलोंडीकडून नरवणकडे उतरायचे. इतके वर्ष नरवणमधे पाणी भरतंय आणि ओसारतय पण प्रमाणात. मग यावर्षीच हे का घडावं. यावर्षी हेदवीकडून नरवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावितरण आणि खासगी कंपनीची पाइपलाइन आणि दुसरी म्हणजे मुसलोंडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने पाइपलाइन आणि मोऱ्या असे काम सुरू आहे. या मोऱ्या आणि पाइपलाइन या भौगोलिक संरचनेचा विचार न करता करण्यात आल्या आणि यामुळे हा पाण्याचा लोंढा खाली गावात आला. संपूर्ण कातळाचे पाणी या चररुपी पाइपलाइन आणि मोऱ्यामधून नरवणकडे वळले. गावात असलेल्या मोऱ्या, नाले, नाल्यात आलेला गाळ व कचरा आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे होरलेली नदी. गावातील पुलापासून एकेकाळी ८-१० फूट खोल पाणी असे. ते आता २-३ फुटावर आलय. बंधारा आणि पुलामधे गाळाचा ढीग साचलाय. पुढे जाऊन शेतं आणि नदी ही समांतर उंचीला आली आहेत. गाळाचे प्रमाण एवढे वाढले आहे की नदी आता प्रवाह बदलू लागली आहे, याकडे आशुतोष जोशी यांनी लक्ष वेधले आहे.
------
ओळी
- rat१५p७.jpg-
N70751
वांद्री येथे मंदिरालगतची कोसळलेली संरक्षक भिंत.

चौकट १

वांद्री येथे सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. येथे मंदिराच्या बाजूने तात्पुरता रस्ता तयार केला होता. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचला. डायव्हर्जन बनवताना सोमेश्वर मंदिराला लागून असलेल्या नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यासाठी योग्य व्यवस्था ठेवली नाही. यामुळे नाल्याला अडथळा निर्माण होऊन पाणी साचून राहिले व पाण्याचा दाब वाढला आणि मंदिरालगतची दगडांनी बांधलेली भिंत कोसळली. भिंतीसोबतच दगडमिश्रित चिखलाचा मोठा ढिगारा थेट सोमेश्वर मंदिराच्या दारात साचला. यामुळे मंदिरात प्रवेश करणे अशक्य झाले आहे.
------
ओळी
- rat१५p१७.jpg-
70722
लांजा ः महामार्गावर बाजारपेठेत पर्यायी रस्ता फोडण्याची नामुष्की शुक्रवारी रात्री ठेकेदार कंपनीवर आली.

चौकट २
१८ दिवसात पर्यायी रस्ता उखडण्याची नामुष्की

लांजात शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील श्रीराम पुलाजवळील घरांमध्ये पाणी शिरल्याने पर्यायी रस्ता उखडून टाकण्याची नामुष्की महामार्ग ठेकेदार कंपनीवर ओढवली. शहरातील श्रीराम पुलाजवळील घरांमध्ये वहाळ तुंबल्याने रात्री साडेअकरा वाजता पाणी भरले. या अगोदर २७ मे रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने वहाळ तुंबल्याने श्रीराम पुलाच्या जवळील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्या वेळी नवीन पुलावरून वाहतूक सुरू करून जुना महामार्ग फोडून वहाळ मोकळा करण्यात आला होता. पुन्हा त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता. तो रस्ता बनवताना गाळ स्वच्छ न करता सिमेंटचे पाईप बसवल्याने पाऊस जोरात पडला तर पाणी तुंबण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अखेर १८ दिवसांतच पर्यायी रस्ता फोडण्याची नामुष्की शुक्रवारी रात्री ठेकेदारावर आली. शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे श्रीराम पुलाजवळील आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे पनोरे सुर्वेवाडी येथील राजू चव्हाण यांच्या घराचे नुकसान झाले. शुक्रवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावरील चिखलयुक्त पाणी आणि डोंगरावरील मातीचा प्रचंड भराव पाण्याबरोबर वाहून येत त्यांच्या घर परिसर आणि अंगणात पसरला आहे.
-------------
चौकट ३
अर्धवट कामाच्या विळख्यात
मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे ठिकठिकाणी महामार्गावर पडलेले खड्डे, अर्धवट गटार कामे आणि पाणी पाइपलाइनसाठी खणून उघडे ठेवण्यात आलेले खड्डे आणि त्यामुळे झालेले चिखलाचे साम्राज्य यातून पादचाऱ्यांना चालत जाताना कसरत करावी लागते. तसेच चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे देखील मोठे हाल होत आहेत. लांजा शहर महामार्गाच्या अर्धवट कामाच्या विळख्यात अडकले आहे.
-------
दृष्टीक्षेपात...
पावसाने काय घडले......

* मुंबई-गोवा महामार्गावर डोंगरातील माती रस्त्यावर
* मंडणगड येथे महामार्गाच्या कामाचा घरांना तडाखा
* गटारे तुंबल्याने पावस बाजारपेठेत पाणी शिरले
* गटारे न बांधल्याने नरवणमध्ये पाणी तुंबले
* चुकीच्या कामामुळे पनोर येथे घराचे नुकसान
------

कोट १
नदीपात्रातील उपसला गेलेला गाळ दुतर्फा टाकण्यात आलेला होता. हा सर्व गाळ पावसाच्या पाण्याबरोबर पुन्हा नदीत आल्यामुळे पाण्याने दिशा बदलली. बाजारपेठेच्या मागील लक्ष्मी केशवाच्या मंदिराकडून येणाऱ्या रस्त्यानेही पाणी वाहून बाजारपेठत आले. त्याचे परिणाम नागरिकांना सहन करावे लागले आहेत.
- प्रणव नाटुस्कर, नरवण
----------

कोट २

शासनाने वेळीच गाळ उपसण्यासाठी निधी दिला असता तर नदीपात्राची खोली वाढवता आली असती. मात्र आमच्या हक्काचा निधीही शासनाने वापरू दिलेला नाही आणि निधीही दिला नाही. त्यामुळे नरवणला पूर आला.
- प्रवीण वेल्हाळ, माजी सरपंच
-----
कोट ३

भूमिगत वाहिन्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तालुक्यात कुठेही बांधकाम विभागाच्या अटी व शर्तींप्रमाणे काम केलेले नाही. याबाबत अनेकवेळा कामाच्या ठिकाणी भेटी देऊन सूचनाही केल्या. तहसीलदार, पोलिस प्रशासनाला ६ पत्रे पाठवली. याहून अधिक करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. मात्र ठेकेदाराच्या अशा कामामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
- योगेश थोरात, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर
----
कोट ४
विकास कामे करताना निसर्गाशी समतोल राखून कामे केली नाहीत तर, प्रत्येकवेळी निसर्गच त्याला उत्तर देणार आहे. हे आजपर्यंत अनेकवेळा निसर्गाने दाखवून दिले आहे. तरीही मानव निसर्गाशी दोन हात करण्याच्या भूमिकेत राहतो आणि त्याचे परिणाम भोगतो. हे थांबविण्याचे काम आपल्याला करावेच लागेल.
- आशुतोष जोशी, निसर्गमित्र, नरवण
------
कोट ५
संगमेश्वर-देवरुख मार्गावर बाजूपट्टी आणि गटारातून केबल टाकताना खाजगी केबल कंपनीला आवश्यकता सूचना देण्यात आल्या होत्या. पाचशे मीटर काम झाल्यानंतर त्यांनी रोलर फिरवायचा होता. अनेक ठिकाणी त्यांनी गाईडस्टोन उखडून टाकले आहेत. अशा अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्राप्त झाल्या असून याबाबत कंपनीला नोटीसही देण्यात आली आहे.
- वैभव जाधव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देवरुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : निष्ठावान विकले जाऊ शकत नाहीत; उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले लक्ष्य

IND vs ENG 5th Test: सर रवींद्र जडेजाने इतिहास रचला! एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम केला; जगातील दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Kamlesh Rai: खंडणीप्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला रंगेहाथ अटक, स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा; व्हिडीओ व्हायरल

Raj Thackeray : मराठी माणसाने मराठी अस्मिता जपावी; राज ठाकरे यांचे प्रतिपादन

Sanjay Shirsat: "सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?" एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT