rat२५p१९.jpg-
२५N७३०१९
पंढरपूर : सायकलवारी पूर्ण करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकल वारकरी.
---
सायकल वारकरी विठुरायाच्या दर्शनाने झाले धन्य
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब; नगर प्रदक्षिणा, रिंगणाचा अनुभवला अविस्मरणीय सोहळा
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : सायकलवरून पंढरपूरवारीचे स्वप्न रत्नागिरी सायकलिस्टच्या दहा सायकलिस्टनी पूर्ण केले. मुखी विठुरायाचे नामस्मरण आणि ३०० किमीचा दोन दिवसांत प्रवास करून पंढरपूरला पोहोचले. राज्यभरातील ९० क्लबच्या साडेचार हजार सायकलस्वारांनी मंदिराला प्रदक्षिणा व सायकल रिंगणही केले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे विशाल भोसले व सहकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे शक्य झाले. आता दरवर्षी जास्तीत जास्त संख्येने सायकलवारी करण्याचे या सायकलिस्टनी ठरवले आहे.
सायकल चालवा निरोगी राहा, झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा प्रदूषण वाचवा, असा पर्यावरणपूरक संदेश वारीतून दिला. या वारीत आरसीसीचे विशाल भोसले, महेश सावंत, अमित पोटफोडे, आरती दामले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे आणि विवेक खानविलकर हे सहभागी झाले.
विशाल भोसले म्हणाले की, पंढरीची वारी करण्याची इच्छा लहानपणापासूनच. काका सायकलवरून पंढरीला जायचे. गेल्या वर्षी मी एकटाच रत्नागिरीतून गेलो होतो. यंदा रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला सोबत घेतले. निसर्गाने परीक्षा घेतली. जाताना जोरदार पाऊस, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खराब रस्ते होते. पांडुरंगाच्या कृपेने संकटावर मात केली. पांडुरंगाच्या आशीर्वादाने व सर्व सदस्यांच्या सहकार्याने, दानशूर व्यक्ती व पंढरपूर येथेही मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अमित पोटफोडे म्हणाले, जणू काही पांडुरंग आमची परीक्षाच बघत होता; पण सर्वांनी ऊन, पाऊस, वारा, वाहतूककोंडी आदी अडचणींवर मात करून वारी पूर्ण करून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नाव पंढरपूर सायकलवारीत नोंदवलं गेलं. रिंगण, तिथे नाचून, विठूरायाचा गजर केला व वेगळी ऊर्जा व आशीर्वाद मिळाले, आम्ही सर्व धन्य झालो.
पहिल्या दिवशी भोसलेवाडी, उंब्रज येथे विशाल भोसले यांच्या घरी पोहोचण्यास उशीर झाला तर भोसले कुटुंबीय, ग्रामस्थ आणि सरपंच व पत्रकार स्वागतासाठी थांबले होते. विठूरायाच्या दर्शनाला जाण्याची ओढ एवढी होती की, कसलाही त्रास जाणवला नाही, असे सावंत यांनी सांगितले.
---
कोट
रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी ही माझ्या सायकलिंग क्षेत्रातील ३२५ कि.मी.ची पहिलीच लांब पल्ल्याची राईड होती. पाऊस, वारा सहन करत आंबाघाट पार करायला दोन तास लागले. हा प्रवास सुखकर झाला. पंढरपूरला पोहोचल्यानंतर वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. पांडुरंगाच्या कृपेने हजारो सायकलिस्ट एकाच ठिकाणी भेटले.
- राकेश होरंबे.
----
कोट २
पंढरपूरला पोहोचलो तेव्हा सायकलवरून उतरून त्या पावन धरतीला पाया पडलो. विठुरायाचे नामस्मरण केले. हे सर्व विठुरायानेच करून घेतले. तसेच हे घडवून आणणाऱ्या विशाल भोसले यांना दुसरा नमस्कार केला. तो क्षण अगदी भावूक होता. सायकलवारीची खरी सुरवात आरसीसीच्या माध्यमातून झाली आणि ती दरवर्षी वाढत राहणार आहे. नगर प्रदक्षिणा व रिंगण घातले तो क्षण अविस्मरणीय होता.
- महेश सावंत.
-----
कोट ३
ही वारी केवळ एक सायकल राइड नव्हती तर तो एक भक्तीचा, आत्म्याचा आणि अविस्मरणीय अनुभवांचा प्रवास होता. पंढरपूरच्या वेशीवर पोहोचताच मिळालेला आनंद शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. पंढरपूरमध्ये प्रवेश करताच सायकलस्वारांचा एक महासागरच उसळला होता. सायकल प्रदक्षिणा आणि रिंगणाचा अनुभव तर अद्भुतच होता.
- आरती दामले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.