73085
हौशी कलाकारांच्या मागण्यांची पूर्तता करा
संघटनेची मागणी : संचालक बिभीषण चवरेंना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ : राज्यातील सर्व हौशी, प्रायोगिक कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, संघप्रमुख, संस्थाप्रमुख यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरावर नव्याने गठीत झालेल्या हौशी प्रायोगिक कलावंत संघ या संघटनेतर्फे राज्य नाट्य स्पर्धेसंदर्भातील विविध मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन मुंबईतील सांस्कृतिक संचालनालय येथे संचालक बिभीषण चवरे यांना सादर केले व विस्तृत चर्चा केली. यावेळी राज्य नाट्य स्पर्धेच्या संदर्भातील विविध मागण्या मान्य करण्याचे संचालकांनी आश्वासन दिले.
या बैठकीस सलीम शेख (नागपूर), अजय धवने (चंद्रपूर), सुरेश गांगुर्डे (मुंबई), केदार सामंत (कुडाळ), मनोज डाळिंबकर (चिंचवड), वैभव सातपुते (मुंबई), इरफान मुजावर (सांगली), अश्विनी तडवळकर (सोलापूर) हे उपस्थित होते.
संघटनेचे पदाधिकारी व रंगकर्मींनी या बैठकीत राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सादरीकरण खर्च सहा हजार, तर अंतिम फेरीसाठी १० हजार रुपये दिले जातात. तर दैनंदिन भत्ता केवळ १५० रुपये दिला जातो. वाढत्या महागाईनुसार सादरीकरण खर्च व दैनंदिन भत्ता यात वाढ करावी, प्राथमिक फेरीसाठी १५ हजार व अंतिम फेरीसाठी २५ हजार सादरीकरण खर्च व दैनंदिन भत्ता ५०० रुपये द्यावा, बालनाट्य, हिंदी संगीत, संस्कृत, दिव्यांग, बालनाट्य आदी स्पर्धांसाठी सादरीकरण खर्च वाढविण्यात यावा, संगीत आणि वेशभूषा यांनाही पारितोषिक द्यावे, ज्याप्रमाणे प्रथम, द्वितीय नाटकाला दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, रंगभूषा यासाठी तीन पारितोषिके देतात, तशी तृतीय क्रमांकाच्या तंत्रज्ञालाही द्यावे, अनेक केंद्रांवर समन्वयकांबाबत तक्रारी सातत्याने येतात त्याचे निराकरण करावे, स्पर्धा समन्वयक नेमण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करावी, ऑनलाईन पद्धतीने अर्जाप्रमाणेच स्पर्धेची अनामत रक्कमदेखील ऑनलाईन स्वरूपात घ्यावी, आदी मागण्या यावेळी केल्या.
यावेळी संचालक चवरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार आमचे काम सुरू असून, लवकरात लवकर याची या वर्षीच्या स्पर्धेपूर्वी अंमलबजावणी करू, बहुतांश मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन दिले. हौशी प्रायोगिक कलावंत संघ ही संघटना राज्यस्तरावर गठीत झाली असून, या संघटनेत सभासद होण्याकरिता राज्यातील कोणतेही हौशी कलावंत, तंत्रज्ञांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य हौशी प्रायोगिक कलावंत संघाच्यावतीने अध्यक्ष सलीम शेख यांनी केले आहे.
---
इतरही काही मागण्या
प्राथमिक व अंतिम स्पर्धेचे वेळापत्रक किमान महिनाभर अगोदर जाहीर करावे, परीक्षक निवड लॉटरी पद्धतीत सुधारणा करावी, हिंदीची स्पर्धा एकाच केंद्रावर घ्यावी, स्पर्धेला पाठविण्यापूर्वी परीक्षकांचे एक वर्कशॉप घ्यावे, स्पर्धा संपल्यानंतरही लगेचच एका महिन्यात सर्व संघांची अनामत रक्कम, सादरीकरण रक्कम आणि टीएडीए द्यावे, तसेच परितोषिक वितरण देखील दोन महिन्यांच्या आत करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.