73101
वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
वसोलीतील घटना : कॉजवेवरील पाण्यातून जाणे बेतले जीवावर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ/माणगाव, ता. २५ ः माणगाव खोऱ्यातील वसोली-सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर वाहून गेलेल्या अमित मोहन धुरी (वय ३०, रा. माणगाव-धरणवाडी) या तरुणाचा मृतदेह आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास कॉजवेपासून दोन किलोमीटर अंतरावर वसोली येथील महात्मा राय याठिकाणी नदीपात्रात आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढत माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. विच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की : माणगाव-धरणवाडी येथील अमित धुरी व माणगाव-डोबेवाडी येथील सखाराम कानडे हे दोघेही दुचाकीवरून सोमवारी (ता. २३) रात्री ८ च्या सुमारास शिवापूर येथे जात होते. तेथे जाताना वाटेत वसोली-सतयेवाडी येथे कुत्रेकोंड कॉजवे लागतो. कर्ली नदीला आलेल्या पुरामुळे कॉजवेवरून पाणी वाहत होते. त्यांना कॉजेवरील पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांनी दुचाकी कॉजवेवरील पाण्यात घालत पुढे जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दुचाकी प्रवाहाबरोबर खाली खेचली गेली. त्यात अमित पुलावरून वाहून गेला. त्याच्यासोबत बसलेला सखाराम सुदैवाने बचावले. या घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्रीच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली होती. काल सकाळी एनडीआरएफ पथकासह प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने घटनास्थळी शोधमोहीम राबविली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा कुठेच थांगपत्ता न लागला नव्हता. दरम्यान, आज पुन्हा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. यावेळी कॉजवेपासून दोन किलोमीटर अमितचा मृतदेह दगडाच्या कपारीत झाडांमध्ये अडकून पडलेला स्थानिकांच्या निदर्शनास आला. याची माहिती माणगाव पोलिस दूरक्षेत्रचे हेडकॉन्स्टेबल सखाराम भोई यांना देण्यात आली. त्यांनी मृतदेहाची खात्री केली व स्वतः पाण्यात उतरून मनोहर गुंजाळ, बापू बागवे व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या शोध मोहीमेत वसोली सरपंच अजित परब, तलाठी अनिल राणे, पोलीस कॉन्स्टेबल आनंद पालव, प्रकाश कदम, कृष्णा सावंत, राजेंद्र परब, दिपक वारंग, पोलिसपाटील आदी सहभागी झाले होते. कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी माणगांव-धरणवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अमितच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई-वडील व भावंडांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अमितच्या मागे आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली व अपघाती जाण्याने धुरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.