73823
‘सिंधुरत्न’ची काळजी नाईकांनी करू नये
दीपक केसरकर ः सोशल ऑडिटनंतर मुदतवाढ मिळेल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळायची आहे. सोशल ऑडिटची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ही मुदतवाढ मिळणार आहे. स्थगितीचा विषय नसून वेळ पडली तर पालकमंत्री नीतेश राणे हे अर्थमंत्री अजित पवारांचे याकडे लक्ष वेधतील, याची मला खात्री आहे. त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्याची काळजी करू नये, असा टोला माजी आमदार दीपक केसरकर यांनी आज लगावला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस सावंतवाडीत की मडुऱ्यात?, असा वाद होता. टर्मिनस सावंतवाडीतच असल्याने गाडी तिथून सुटते व थांबते. रेल्वे टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी आणखीन निधीची गरज आहे. कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती नसल्याने काम रखडले आहे. त्यामुळे ‘सिंधुरत्न’मधून निधी देण्याची व्यवस्था केली आहे. पाण्याची अडचण देखील आम्ही दूर केली आहे. हिंदीची सक्ती महाराष्ट्रात नाही. पाचवीनंतर हिंदी विषय फार आधीपासून आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते चौथीसाठी पर्यायी भाषा आहेत. सुकाणू समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या आहेत. कुठली भाषा घ्यावी, हे विद्यार्थ्यांवर असेल. विद्यार्थी नऊ आंतरराष्ट्रीय भाषा शिकू शकतात; मात्र, मराठी भाषा शिकावीच लागेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे, हा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, मराठी ही सक्तीचीच आहे. बारावीनंतरही पुढचे शिक्षण मराठीत व्हावे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण सुद्धा मराठीतून घेता येणार आहे. मराठीसाठी आमच्या काळात जे केले, ते कोणीही केलेले नाही. मुलांच्या पुस्तकांचा बोजा सरकारने कमी करावा, ही माझी मागणी आजही कायम आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलण्याची मागणी मी केली आहे. लवकरच यासाठी टीम येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडाला गेल्यास याचा फायदा होईल. हा मार्ग शक्तिपीठला जोडणारा आहे. या महामार्गाचा कोकणाला फायदा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. बांदा ही बाजारपेठ गजबजलेली आहे. तिथे होणारे नुकसान देखील यामुळे टळू शकेल. सातार्डा पूल दूरुस्ती सूचना अधिकारी वर्गाला देणार आहे. आंबोलीत दुर्घटना घडू नयेत, यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन टीम तैनात असून त्यांना आवश्यक कीट पुरविण्यात आले आहेत.’’ प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, महावितरण अभियंता अभिमन्यू राख, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब आदी उपस्थित होते.
...................
वीज व्यवस्थापनाबाबत योग्य काळजी घेऊ
यावेळी मतदारसंघातील वीज समस्यांबाबत बैठक झाली. वीज समस्यांवर दूर करण्याचे काम महावितरण सोमवारी (ता. ३०) करणार आहे. त्यांना आवश्यक वाहन मी आजच भाडेतत्त्वावर पुरवीत आहे. इतर साधनसामग्रीची कमी पडणार नाही, याचीही दक्षता घेतली आहे. विजेचे व्यवस्थापन व आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या टीम गावागावांत राहतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्गम भागातही त्यांची सोय प्रशासन करेल, अशी माहिती आमदार केसरकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.