कोकण

हवामान बदलतयं, शेतीही बदलायला हवी

CD

rat२९p७.jpg
७३९६८
राजापूर ः एका बाजुला नांगरणी आणि दुसऱ्या बाजुला भात लावणीची कामे सुरू झाली आहेत.
rat२९p८.jpg
७३९६९
संगमेश्वर ः पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी भात लावणी करताना महिला.
rat२९p९.jpg-
७३९७०
रोपांची रूजवात होत आहे.

इंट्रो

गेल्या काही वर्षामध्ये निसर्गासह हवामानामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलाचा परिणाम होऊन मान्सूनचेही चित्र बदलताना दिसत आहे. त्यामध्ये तापमानवाढीसह चक्रीवादळांचाही तडाखा बसू लागला आहे. पावसाची अनियमितता वा बदलाचा भातशेतीसह आंबा, काजूपिकांवर परिणाम होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडू लागले आहे. पाऊस अन् वातावरणातील बदल भविष्यामध्ये कायम राहणार असल्याने आता त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे. बदलत्या वातावरणामध्ये कृषी क्षेत्रातील किफायतशीर शेतीने निर्माण होणारे अर्थकारणातील सकारात्मक बदल टिकवण्यासाठी आणि त्यात सातत्य राखण्यासाठी कोकणातील शेती, बागायतींबाबत संशोधनाची आवश्यकता आहे. त्यात शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेले बदल लक्षात घेऊन कृषी विद्यापिठाने पुढाकार घेतला पाहिजे. काही शेतकऱ्यांनी वातावरणातील बदल आणि हवामानखात्याचे अंदाज याला तोंड देईल अशी शेती करायला सुरवात केली आहे. अशा स्थानिक शहाणपण अथवा स्थानिक हुशारीचा आदर करत उपाय करायला हवेत. खासगी नोकरशाही आणि संशोधक प्राध्यापक मंडळींचे अहं. या पलिकडे जाऊन विचार व्हायला हवा.......!
- राजेंद्र बाईत, राजापूर
.................

हवामान बदलतयं, शेतीतही हवा बदल
संशोधनाची गरज; बळीराजाच्या प्रयोगाची दखल आवश्यक,भरड धान्याला महत्व

मान्सूनच्या आगमन अन् निर्गमनाचा कालावधी बदलतोय हा सर्वात मोठा ढोबळपणे जाणवणारा मुद्दा आहे. महाराष्ट्रात येणारा मान्सून सर्वप्रथम तळकोकणात दाखल होतो. त्यानंतर, राज्यभर त्याचा राज्यभर प्रवास सुरू होतो. साधारणतः २० मेनंतर मान्सूनपूर्व सरी, ७ जूननंतर मान्सूनला प्रारंभ आणि सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात मान्सूनची माघार असे सर्व ऋतूचक्र वर्षानुवर्षे सुरू राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये या ऋतूचक्रामध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा प्रारंभ होऊन पुढे नोव्हेंबरपर्यंत मान्सूनचे वास्तव्य लांबलेले दिसते. यावर्षी तर, कहरच झाला. मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडला. त्यामध्ये चक्रीवादळामुळे पाऊस पडल्याचे सांगितले जाते. मात्र, चक्रीवादळामुळे सुरू झालेला पाऊस पुढे नियमितच झाला आहे.

.............

भातशेतीचे गणित बिघडले

साधारणतः २० मेनंतर मान्सूनपूर्व सरी, ८ जूननंतर मान्सूनला प्रारंभ आणि सप्टेंबरअखेर ते ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात मान्सूनची माघार असे सर्वसाधारणतः ऋतूचक्र एखादे वर्ष अपवाद वगळता कायम राहिले होते. पावसाच्या या प्रवासाचा अंदाज घेत शेतकऱ्यांकडून हळवी, मध्यम आणि दीर्घ कालावधीच्या भातबियाण्यांची लागवड केली जाते. या लागवडीप्रमाणे गणेश चतुर्थी ते दिवाळी या सणांच्या दरम्यान हळवी, मध्यम आणि १३० ते १४५ दिवसांच्या दीर्घ मुदतीचे भातपिक तयार होऊन त्याची कापणी केली जाते. मात्र, गेल्या तीन-चार वर्षामध्ये पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेमध्ये भातशेतीची कापणी करणे शक्य होत नाही. त्यामध्ये कापलेले भातपिक पावसामध्ये भिजून, जमिनीवर आडवे होवून वा कीडरोगाचा प्रादुर्भाव होऊन भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने भातशेतीकडे शेतकऱ्यांकडून पाठ फिरवली जात असताना दरवर्षी घटणाऱ्या भातशेतीक्षेत्राला गेल्या काही वर्षामध्ये लांबणाऱ्या पावसामध्ये होणाऱ्या नुकसानीचीही भर पडू लागली आहे.

चौकट
यंदाच्या भातशेतीवर दृष्टिक्षेप

* मे महिन्यातील पावसामुळे खरिपचे वेळापत्रक बिघडले
* भात बियाणे रुजून येण्यासाठी वाफसा अत्यल्प
* ओल्या जमिनीत बियाणे पेरल्यामुळे रूजवा कमी
* पेरलेले बियाणे मोठ्याप्रमाणात वाया गेले
* पुनर्लागवडीसाठी रोपांची कमतरता
* शेतकऱ्यांवर दोन वेळा पेरणी करण्याची वेळ
* पुनर्लागवडीनंतर काही ठिकाणी रोऊ पेरणी
* भात उत्पादनावर परिणामाची शक्यता

...........

फळपिक नुकसानीच्या खाईत

शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेत कोकणातील शेतकर्‍यांनी आंबा, काजू, कोकम, नारळ,सुपारी या प्रमुख फळझाडांची लागवड करत बागायती विकसित केल्या आहेत. फळबागायतीच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दरवर्षी वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये आंबा आणि काजूच्या उत्पादनातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. पावसाच्या बदललेल्या स्वरूपाचा भातशेतीप्रमाणे या फळबागायतींनाही फटका बसताना दिसत आहे. गेली तीन-चार वर्ष सातत्याने डिसेंबर ते मार्चदरम्यान कोकणामध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाने आंबा उत्पादकांना मोठा नुकसानीचा तडाखा सहन करावा लागला आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस माघारी गेल्यानंतर थंडी पडते. यात सरासरी १५ ते १६ अंशांपर्यंतचे तापमान आंबा मोहोरासाठी पोषक ठरते. मात्र, अचानकपणे वातावरणात बदल होत असल्याने वातावरणात उष्मा वाढतोय. त्याच्यातून, फळगळती, कीडरोग, बुरशी, फळमाशीचा प्रार्दुभाव राहत आहे. या सार्‍याचा फटका बसून आंबा पिकाला नुकसानीच्या झळा बसत आहेत. यंदा तर ४० ते ४५ टक्के आंबा उत्पादन आले. त्यामध्ये हंगामाच्या अखेरीला चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आंबापिकाला तडाखा बसला. त्याच्यातून, आंबापिकाचे पुरते अर्थकारण बिघडल्याने आंबापिक घ्यायचे की नाही, अशा विचित्र मानसिकतेमध्ये आंबा बागायतदार अडकला आहे.

..............

उष्णतावाढ अन् तापमानातील बदलाचा फटका

मान्सूनची अनियमितता आणि तापमानात होणारी वाढ काजू आणि इतर पिकांच्यादृष्टीने हानिकारक ठरत आहे. गेल्या काही वर्षामध्ये दिवसा ३८ अंश ते ४० अंशापर्यत वाढत जाणारे तापमान रात्री १७ ते २० अंशापर्यंत खाली उतरत आहे. सातत्याने तापमानामध्ये होणारे हे बदल काजू पिकासाठी हानीकारक ठरत आहेत. त्याच्या जोडीला रात्री पडणारा दव, सातत्याने पडणारे धुके यामुळे काजूपिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातून, कोकणचं पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणार्‍या काजूपिकाला आता थ्रीप्स किडीच्या प्रादुर्भावाच्या नव्या संकटाने घेरलं आहे. थ्रीप्स किडीच्या अनेक जाती असून यापूर्वी आंबा, मिरची, तंबाखू यांसह फूलशेतीवर आढळून येणारी थ्रीप्सची जात आता काजू पिकावरही आढळून येऊ लागली आहे. थ्रीप्सचा प्रादुर्भाव आणि होणाऱ्या नुकसानीबाबत काजू अभ्यासक डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांनी पुष्टी दिली असून दैनंदिन निरीक्षण, शेतकऱ्यांशी संवाद आणि अभ्यासाअंती त्याबाबत त्यांनी काही नोंदीही केल्या आहेत. एकंदरीत, सातत्याने तापमानामध्ये होणारे बदल, उष्णता वाढ याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे.

............

बदलत्या ऋतूचक्रानुसार शेतीपद्धतीत बदलाची गरज

पावसाच्या अनियमिततेमुळे पारंपरिक भातशेती, बागायती यांचे सद्यःस्थितीमध्ये होत असलेले नुकसान लक्षात घेता भविष्यामध्येही अशाप्रकारे नुकसीनीची धग कायम राहण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे बदलत्या ऋतूचक्राचा अभ्यास होऊन त्यानुसार शेतीपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भात शेतीमध्ये सगुणा राईस टेक्निक या पद्धतीने भात लागवड कमी पाऊसात, कमी खर्चात होऊन पावसावरील अवलंबित्व कमी होईल. आंबापिकांमध्ये कोकणातील अनेक शेतकरी दरवर्षी उत्पादन देणार्‍या आणि तुडतुडा, थ्रीप्स यांचा प्रादुर्भाव कमी असणाऱ्या जातीची लागवड करीत आहेत. त्याचाही फायदा आंबा बागायतदारांना होईल. काजूमध्ये योग्यवेळी कीटकनाशकांचा वापर करून उत्पादन टिकवावे लागेल. नारळ, सुपारी बागायतदारांनीही योग्य वेळी बुरशीनाशके, कीड नियंत्रकांचा वापर करून आपल्या बागामधील उत्पादन वाढवावे लागेल. कोकम, फणस यांसारख्या पिकांमध्ये अवेळी पावसामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यात मोठी अडचण येते अशावेळी ड्रायर वापर करून आपले प्रॉडक्ट तयार करता येतील. कारण कोकम, फणसपोळी, तळलेले गरे यांना बाजारामध्ये वर्षभर मोठी मागणी असते. त्यामुळे बदलत्या हवामानात आपल्या या कोकणी उत्पादनांना टिकून राहायचे असल्यास मशिनरीचा वापर करून पदार्थ करावे लागतील.

................

भरड धान्य लागवडीला प्राधान्याची आवश्यकता

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य, पौष्टिक तृणधान्ये तथा भरड धान्य लागवड अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची कृषी विभागातर्फे अंमलबजावणीही केली जात आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या भरड धान्याला मोठी मागणी आहे. या भरड धान्यासाठी कमी पाऊस लागतो. अनियमित पावसाचाही भरड धान्य लागवडीवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना भातशेतीसह भरड धान्य लागवडीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी तरुणांनी तसेच महिला बचतगटांनी एकत्र येऊन नाचणी, वरी यांसारखी बदलत्या वातावरणात तग धरणारी पिके घेणे गरजेचे आहे. नाचणी, वरी यांचे प्रकियायुक्त पदार्थ तयार करून त्यांचे योग्यप्रकारे ब्रॅण्डिंग करून विक्री व्यवस्था निर्माण केल्यास त्याचा चांगला आर्थिक लाभ मिळवू शकतो. त्यासाठी सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता आहे.

............

हवामानावर आधारित शेती उत्तम पर्याय

हवामान, वातावरणामध्ये सातत्याने होणार्‍या बदलावांमध्ये ‘हवामान अनुकूल शेतीपद्धती’ शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये विशिष्ट ठिकाणच्या हवामानाचा अंदाज, पावसाचे प्रमाण, तापमान, वार्‍याची दिशा आणि इतर घटकांचा विचार करून पिकांची निवड, लागवड, किड-रोगांचा अभ्यास आणि व्यवस्थापन केले जाते. ज्यामुळे उत्पादन वाढ, पाण्याची बचत, खतांचा योग्य वापर आणि किडी-रोग नियंत्रण करीत खर्च कमी होतो. अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी करता येते. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानामुळे होणारे नुकसान कमी करीत शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात. अशाप्रकारचा शेतीतील प्रयोग खेड तालुक्यातील वेरळ येथील सदानंद उर्फ आप्पा कदम या प्रगतशील शेतकऱ्याने केला आहे. त्यामध्ये ते हवामानावर आधारित शेती करत आहे. त्यांच्या या प्रयोगाला कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचीही साथ लाभली आहे.

---------
चौकट १

प्रत्येक गावाची पाण्याची व्यवस्था उद्धस्त

कोकणाला मान्सूनच्या पावसाचे वरदान लाभले आहे. पावसाचा वरदहस्त बळीराजाला मात्र झेपवता येत नाहीये. पाऊस कमी झालाय का तर नाही..अनियमित झालाय. पाणी अडवा-जिरवा ही कोकणातील मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताच नाही. बोअरवेलवर कोणाचंच नियंत्रण नाही.पुरेसे पाणी उपलब्ध असेल तर प्रत्येक जण स्वतंत्र विहीर खोदणार नाही.चुकीची पिकं,पाण्याचा अनावश्यक वापर, उघडेबोडके डोंगर यांनी जमीनीतील पाण्याची पातळी वर्षागणीक खालीखाली जात्येय. पाऊस कमी झालेला नाही तर त्याचं पाणी थांबवण्याचं नियोजन आपण करु शकलेलो नाही.प्रत्येक गावाची एक पाण्याची व्यवस्था होती. तलाव,पाट, विहीरी,जुनी धरणं, प-यातल्या कोंडी, पाणथळ जागा..हे सारं आपण कोणताही विचार न करता उध्वस्त करुन टाकलं. होते ते पाण्याचे स्त्रोत पुनरुज्जीवीत करण्याचा,बळकट करण्याचा कुठेच विचार नाही.मुळात
कोकणातील गाव-वस्तीचा विचार करून योजना आखायला हव्या.इथल्या बळीराजाला त्या नियोजनात सामिल करुन घ्यायला हवं.पाणी अडवून जिरत नसेल तर साठवण्यावर संशोधन हवं.एक नैसर्गिक चक्रही दिसतं.ज्या गावांच्या उशाला (वरच्या सडा भागात) जांभ्या दगडाच्या खाणी आहेत तिथे विहिरींच पाणी लवकर आटत नाही. नद्या प-येही ब-यापैकी शेवटपर्यंत वहातात.हे वाहणारं पाणी परत या खाणीत भरता आलं तर ते सावकाश जीरून शेवटपर्यंत डोंगर उतारावरील जमीनीत मुरत राहील.आता सौर उर्जा, उतारावरील उंचीचा फायदा घेऊन पाणी पुन्हा पंपांनी डोंगरावर आणणं अशक्य किंवा पुनर्वापर करणं ही कवीकल्पना नाही.हवामान बदलाचा सामना असाही करता येईल असा मुद्दा जांभुळआड पूर्णगडचे प्रगतशील शेतकरी जयंत गोपाळ फडके यानी मांडला आहे.

..............

कोट १
वातावरणातील बदल आणि त्याचे परिणाम यावर प्रभावी संशोधनाची आवश्यकता आहे. प्रादेशिकतेनुसार विशेषतः कोकणची भौगोलिक रचना, पीकपद्धती वेगळी आहे. त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्रपणे विशेष संशोधन अन् अभ्यास होणे गरजेचा आहे. हवामानातील बदलाचा अभ्यास करून सद्यःस्थितीतील पारंपरिक पीकपद्धती टिकवताना बदलत्या हवामानामध्ये फायदेशीर ठरणारी नवी पीकपद्धत विकसित करण्याबाबत विचारविनिमय वा संशोधन व्हावे. जेणेकरून, सातत्याने होणाऱ्या बदलांचा शेतकऱ्यांना सामना करण्यास निश्‍चितच मदत होईल.
- डॉ. शैलेश शिंदेदेसाई, कृषी अभ्यासक
...............

कोट २
निसर्ग, हवामान यामध्ये बदल होत असून, त्या बदलावामध्ये पूरक ठरणारे शेती, फळबाग लागवडीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत शेतकऱ्यांचे कृषी विभागातर्फे प्रबोधन केले जात आहे. त्यामध्ये हवामानावर आधारित आणि प्रतिकूल हवानामध्येही उपयुक्त ठरणाऱ्या ‘सीआरए’ या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फळबाग लागवड केली जात आहे. त्यामध्ये यावर्षीच्या एकूण होणाऱ्या फळबाग लागवडीमध्ये किमान वीस टक्के फळबाग लागवड ‘सीआरए’ तंत्रज्ञानावर आधारित असावी यावर भर दिला आहे. त्याचवेळी पावसाची अनियमिततता आणि कमी पाण्यामध्ये होणाऱ्या नाचणीसारख्या पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे.
- शिवकुमार सदाफुले, रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
..................
कोट ३
निसर्गासह हवामानातील बदलांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेती करणे गरजेचे आहे. पावसाची अनियमितता असली तरी, समाधानकारक पडणार्‍या पावसामुळे त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवर फारसा परिणाम दिसत नाही. मात्र, कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करून विकसित केलेल्या भाताच्या वाणांचा अधिकाधिक वापर शेतीतील उत्पादकतेच्यादृष्टीने बदलत्या हवामानातही अधिक फायदेशीर ठरेल.
- डॉ. विजय मोरे, संशोधन उपसंचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

-----
कोट ४
यंदा मे महिन्यात पडलेला बिगर मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक आहे. हा पाऊस अपेक्षित नाही. त्यामुळे आंबा हंगाम लवकर संपुष्टात आला. त्याचबरोबर कलमांना पालवीही लवकर आली. त्यावर तुडतुडा, किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला. तसेच खरिप हंगामावरही मोठा फटका बसलेला आहे. भात बियाणे पेरणं, ५० टक्केच रुजवात होणे, लवकर भात पेरूनही उशिरा रूजणे, बियाणे खोलवर न रुजणे असे परिणाम यंदा पहायला मिळत आहेत. तसेच सध्या पडणारा पाऊस भात लावणीसाठी पुरेसा नाही. हे वातावरम लक्षात घेऊन भविष्यात शेतकऱ्यांनी पुर्वनियोजन करणे गरजेचे आहे. दुरदृष्टी ठेवून शेतीबागायतीचे व्यवस्थापन हाच यावरील उपाय आहे.
- डॉ. किरण मालशे, भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख

---
कोट ५
यंदा लवकर पडलेल्या पावसाचा परिणाम शेतीवर झालेला आहे, हे निश्चित. यावर्षी कोकणात १०६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. मे महिन्यात पडलेला अनपेक्षित पाऊस, पुढे जून महिन्यातही सरासरीएवढाच पाऊस झाला आहे. आता जुलैमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे सर्व वातावरण बदलाचे परिणाम असून ते पुढील २०३० पर्यंत जाणवत राहणार आहेत. त्यानुसार शेतीचे नियोजन केले पाहिजे.
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT