73993
जनतेसाठी विकासनिधी खेचून आणू
नीलेश राणे ः पोईपमध्ये ‘महाआवास’ सन्मान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजनांपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष हवे. विकासकामे व जनकल्याणकारी योजनांसाठी अधिकाधिक मागणी प्रस्ताव पाठवा. महायुती सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध राहू,’’ असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी पोईप येथे केले.
ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग, मालवण पंचायत समिती प्रधानमंत्री आवास योजना, पंचायत समिती मालवण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांतर्गत महाआवास अभियान मालवण येथे तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सिद्धिविनायक सभागृहात झाला.
यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, सरपंच श्रीधर नाईक, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दीपक पाटकर, पंकज वर्दम आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, नवीन सिंचन विहीर बांधणे, तसेच पंधरावा वित्त आयोगांतर्गत तीन वर्षांत प्राप्त अनुदानातून सर्वाधिक रक्कम खर्च करणे या अंतर्गत विविध सन्मान, तसेच आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन करून आंबा उत्पादनामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करत जागतिक स्तरावर हापूस आंब्याची प्रथम पेटी पाठविण्याचा जागतिक विक्रम केलेले उपक्रमशील शेतकरी डॉ. उत्तम फोंडेकर यांनाही सन्मानपत्र देण्यात आले. यासह जिल्हा राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावणारे गटशिक्षणाधिकारी संजय माने व कार्यतत्पर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. आमदार राणे यांनी गटविकास अधिकारी चव्हाण यांचे विशेष कौतुक केले. गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला. चंद्रसेन पाताडे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.